World Cup 2019 : खेळाडूंना विश्रांती तर सपोर्ट स्टाफला काम

सुनंदन लेले
Tuesday, 18 June 2019

नॉटिंहॅमचा न्युझीलंड समोरचा सामना पावसाने रद्दं झाला. तरीही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान असे दोन महत्त्वाचे सामने खेळून भारतीय संघातील खेळाडू थोड्या विश्रांतीची योजना आखत होते.

वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : एका आठवड्यात तीन सामन्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी भारतीय संघाने केली होती. त्यातील नॉटिंहॅमचा न्युझीलंड समोरचा सामना पावसाने रद्दं झाला. तरीही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान असे दोन महत्त्वाचे सामने खेळून भारतीय संघातील खेळाडू थोड्या विश्रांतीची योजना आखत होते.

पाकिस्तान समोरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर, चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता केल्यावर संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना दोन दिवस संपूर्ण सुट्टी जाहीर केली. शिखर धवनच्या दुखापतीने इंग्लंडला दाखल झालेला रिषभ पंत एकदम दिलखुलास स्वभावाचा आणि हसर्‍या चेहर्‍याचा असल्याने संघात पटकन मिसळून गेला आहे. 

बरेच खेळाडू फुटबॉल प्रेमी असल्याने मँचेस्टर युनायटेड क्लबची टूर बर्‍याच जणांनी केली. ‘‘लक्षणीय इतिहास आहे या क्लबचा. आणि तो जपण्याची परंपरा भावणारी आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबच्या संपूर्ण संघ जात असलेल्या विमानाला झालेला अपघात आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती ऐकून खलास व्हायला झाले’’, दिनेश कार्तिक म्हणाला.

बीसीसीआयने घातलेल्या नियमानुसार पहिल्या पंधरवड्यात कुटुंबाला खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी नव्हती. तो काळ संपल्याने बर्‍याच खेळाडूंची कुटुंब येऊन संघ राहात असलेल्या हॉटेलात सामील झाली आहेत. ज्या खेळाडूंना लहान मुले आहेत ते सुट्टीचा आनंद घेताना मुलांबरोबर फिरताना मँचेस्टरमधे दिसले. महेंद्रसिंह धोनी जास्त बाहेर फिरत नसला तरी मुलगी झिवा बरोबर हॉटेलात दंगा करत असल्याचे समजले. 

खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना सपोर्ट स्टाफमात्रं कामात गर्क आहे. भुवनेश्वर कुमारच्या मांडीला झालेल्या दुखापतीचे स्वरूप समजले नाही तरी तो पुढचे किमान तीन सामने संघातून खेळणार नसल्याचे कळले. त्याच बरोबर शिखर धवनच्या अंगठ्याची दुखापत किती भरली आहे याची चिंता सगळ्यांना आहे. संघातील काही खेळाडू असेही आहेत जे नुकतेच दुखापतीतून सावरून मैदानात उतरले आहेत. अशा खेळाडूंना तंदुरुस्त ठेवायला पॅट्रीक फरहात फिजिओ म्हणून, शंकर बासू व्यायाम तज्ज्ञ म्हणून आणि अरुण कानडे मसाज थेरपिस्ट म्हणून काटेकोर प्रकारे काम करत आहेत.

दोन दिवसांची सुट्टी संपवून बुधवारी भारतीय संघ साउदम्पटनला प्रवास करणार आहे. बाकी सर्व सामन्यांना संघ खास बसने प्रवास करत असताना मँचेस्टर - साउदम्पटन अंतर लांब असल्याने हा एकच प्रवास विमानाने करायचा विचार चालू असल्याचे समजले.


​ ​

संबंधित बातम्या