सर्वांनाच हवीहवीशी 'सनी'ची 'वन-डे सेंच्युरी'

मुकुंद पोतदार
Wednesday, 10 July 2019

कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून दुसराच ठरला. नाबाद 36 धावांची खेळी झाली तेव्हा तो वन-डेच्या इतिहासातील पहिलाच "वर्ल्ड कप" होता.

कसोटी क्रिकेटमधील "विक्रमादित्य' सुनील गावसकर ऊर्फ "सनी'च्या वन-डे कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास दोन महत्त्वाचे आकडे दृष्टीस पडतात. हे दोन्ही आकडे वर्ल्ड कपशी संबंधित आहेत. कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून दुसराच ठरला. नाबाद 36 धावांची खेळी झाली तेव्हा तो वन-डेच्या इतिहासातील पहिलाच "वर्ल्ड कप" होता.

लॉड्‌सवर इंग्लंडने 60 षटकंत 334 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानासमोर सलामीला आलेला "सनी' 174 चेंडूंत फक्त 36 धावा करू शकला. त्याला एकच चौकार मारता आला. त्याने 60 पैकी तब्बल 29 षटके एकट्याने खेळून काढली होती. भारताने तीनच बळी गमावले, पण धावा फक्त 132 झाल्या. तत्कालीन कर्णधार एस. वेंकटराघवन आणि संघव्यवस्थापक जी. एस. रामचंद यांनी "सनी'च्या खेळाविषयी नाराजी व्यक्त केली. त्याआधी 1971च्या वेस्ट इंडीज दौऱ्यात तेथील खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांविरुद्ध अतुलनीय कामगिरी केलेल्या "सनी'ची वन-डेमधील अशी पीछेहाट त्याच्या चाहत्यांना धक्का देणारी होती. 

त्यानंतर मात्र "सनी'ने वन-डे हीच आपल्यासाठी "कसोटी' असल्याचा दृष्टिकोन ठेवला. त्याने 27 अर्धशतके काढली. दोन वेळा त्याने 92 धावांपर्यंत मजल मारली. 1986 मध्ये सिडनीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांवर नाबाद राहिला, तर त्याच वर्षी शारजामध्ये पाकिस्तानविरुद्ध तो 92 धावांवर बाद झाला. त्याच सामन्यात जावेद मियॉंदादने चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर सनसनाटी "सिक्‍सर' मारली होती. "सनी'चे हे 92 धावांचे दोन "स्कोअर'च थोडा दिलासा देणारे होते, पण कसोटीमध्ये विक्रमी 34 शतके काढलेल्या या फलंदाजाला दोन "सेंच्युरी' मात्र काढता येत नव्हत्या. लॉर्डसवर कसोटीत, तर वन-डेमध्ये (कुठेही) त्याचे शतक व्हावे असे चाहत्यांना वाटत होते. 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध बंगळूरला "सनी'चे शतक चार धावांनी हुकले आणि पर्यायाने भारताचा विजयही हुकला. भारताने ती कसोटी आणि त्याचबरोबर मालिका गमावली. "सनी'ने नंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे लॉर्डसवरील कसोटी शतकाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. 

त्याच वर्षी झालेल्या रिलायन्स विश्‍वकरंडक स्पर्धेत मायदेशात भारताकडून खूप आशा होत्या. गटसाखळीत न्यूझीलंडविरुद्ध अखेर "सनी'ने सर्वांनाच हवेहवेसे शतक काढले. डॅनी मॉरिसन, चॅटफिल्ड, मार्टिन स्नेडन, दीपक पटेल यांच्यापैकी कुणीही "किवी' गोलंदाज "सनी'ला रोखू शकला नाही. के. श्रीकांतने नेहमीप्रमाणेच फटकेबाजी केली. त्याने 75 धावा केल्या, तर "सनी' 103 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी चेतन शर्माने "हॅट्ट्रिक'चा पराक्रम केला होता. "सनी'साठी महत्त्वाच्या ठरलेल्या वन-डेमध्ये चेतन शर्माची कामगिरीसुद्धा निर्णायक ठरली होती, हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अर्थात "सनी'चे वन-डेमध्ये शतक काढण्याचे स्वप्न छान साकार झाले होते, कारण त्याने "वर्ल्ड कप'मध्ये शतक काढले होते, जे सर्वांनाच वाटत हवेहवेसे होते!   


​ ​

संबंधित बातम्या