सुशीलचे पुनरागमन सहा मिनिटांचे

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

-सुशील कुमार याचे जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील पुनरागमन शुक्रवारी केवळ सहा मिनिटांचेच ठरले.

-स्पर्धेतील 73 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत त्याला अझरबैझानच्या खाडझीमुराद गादझीयेव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. 

-ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळविणारा 36 वर्षीय सुशील गेली वर्षभर सातत्याने अपयशी ठरत आहे. 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

नूर सुलतान (कझाकस्तान) - भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता आणि अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार याचे जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील पुनरागमन शुक्रवारी केवळ सहा मिनिटांचेच ठरले. स्पर्धेतील 73 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत त्याला अझरबैझानच्या खाडझीमुराद गादझीयेव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. 
यानंतर गादझीयेव याला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन अर्नेस्ट बुरोघकडून पराभव पत्करावा लागल्याने सुशीलचे रिपेचेजमधून आव्हान राखण्याचेही स्वप्न भंग पावले. 
सुशीलने आपला अनुभव पणाला लावत लढतीला 9-4 अशी झकास सुरवात केली होती. मात्र, त्याला आपल्या लढतीतील वेग आणि सातत्य राखता आले नाही. आक्रमक राहिल्यानंतर काहिशा दमलेल्या सुशीलवर गादझीयेव याने प्रतिआक्रमण करत सलग सात गुणांची कमाई करताना 11-9 असा विजय मिळविला. सुशील लढतीच्या सुरवातीला 0-2 असा मागे पडला होता. मात्र, नंतर त्याने आक्रमकता आणताना पाठोपाठ दोनदा एकत्रित चार गुणांची कमाई केली. त्याच्या दुसऱ्या एकत्रित गुणाला प्रतिस्पर्धी प्रशिक्षकाने आव्हान दिले. मात्र, पंचांनी रिप्ले पाहून ते फेटाळून लावल्यावर तो एक गुणही सुशीलला मिळाल्याने त्याने 9-4 अशी मोठी आघाडी मिळविली होती. दुसऱ्या फेरीत मात्र सुशील काहिसा दमला होता. याचा फायदा घेत गादझीयेव याने एकत्रित चार गुणांची कमाई केली. नंतर त्याच्यावर ताबा मिळवून दोन गुणांची कमाई केली आणि आघाडी घेतली. अखेरच्या काही मिनिटात त्याने आणखी एका गुणाची कमाई करताना विजय निश्‍चित केला. 
सुशील पाठोपाठ 125 किलो वजनी गटात सुमीत मलिकही पहिल्याच फेरीत हंगेरीच्या डॅनिएल लिगेटीकडून 0-2 असा हरला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याचेही आव्हान संपुष्टात आल्याने सुमीतचा प्रवासही थांबला. 
ऑलिंपिक गट नसलेल्या 70 किलो वजन गटात करण आणि 92 किलो वजन गटात प्रविण या दोघांनाही पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुढे त्यांचे प्रतिस्पर्धीही पराभूत झाल्याने भारतीयांचे रिपेचेजचेही आव्हान संपु÷ष्टात आले. 
सातत्याने अपयशी 
ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळविणारा 36 वर्षीय सुशील गेली वर्षभर सातत्याने अपयशी ठरत आहे. 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तो बेलारुस येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही उतरला होता. मात्र, तेथेही त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता जागतिक स्पर्धेतही पुनरागमन त्याचे अपयशीच ठरले. 
बजरंग, रवीला ब्रॉंझ 
संध्याकाळच्या सत्रात बजरंग पुनियाने 65 किलो वजन गटात मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिर याचे आव्हान चुरशीच्या लढीत 8-7 असे परतवून ब्रॉंझपदक पटकावले. रवी कुमार याने देखील इराणच्या रेझा अर्ची नागार्ची याचा 6-3 असा पराभव करून ब्रॉंझपदक मिळविले. या दोघांनी यापूर्वीच ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या