भारतीय क्रिकेटपटू म्हणतात, हा सामना तर एकतर्फी झाला!

सुनंदन लेले
Thursday, 23 May 2019

बंगालमधले निकाल ऐकून खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त केले. गौतम गंभीर निवडून आल्याचे समजल्यावर शिखर धवनने समाधान वाटल्याचे बोलत, "गौती भाई जरूर अच्छा काम करेंगे'', असे खात्रीने सांगितले. 

विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही नाही संपूर्ण सात आठवडे मी आहे... कारण भारतीय संघ तुमच्या संघाबरोबरच अंतिम सामना खेळणार आहे ना 14 जुलैला'', मी हसत हसत बोललो आणि तो अधिकारीपण हसू लागला. 

भारतीय संघ विश्‍वकरंडकाकरता लंडनला दाखल झाला आणि एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सगळे खेळाडू मोठ्या उत्साहाने सरावाला हजर झाले. ओव्हल मैदानावर सराव करताना खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आणि हालचालीतला उत्साह जाणवत होता. 

एक तास कसून सराव केल्यावर विराट कोहली आयसीसीच्या पत्रकार परिषदेकरता रवाना झाला. बाकीच्या खेळाडूंनी नंतर दीड तास सराव चालू ठेवला. केदार जाधव फिजिओ पॅट्रीक फरहातच्या देखरेखीखाली काहीसा सांभाळून सराव करताना दिसला. "प्रगती योग्य मार्गाने चालू आहे'', ओव्हल मैदानावर भेटल्यावर केदार जाधवने म्हणाला. 

फलंदाजीचा सर्वात विस्तृत सराव महेंद्रसिंह धोनीने केला. सरावानंतर भेटल्यावर "उधर बडा मॅच चालू है इलेक्‍शन रिझल्टस्‌ का और आप यहॉं क्‍या कर रहे हो'', धोनी हसत हसत म्हणाला. थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर धोनीला पायरी आंबे दिल्यावर गडी खूश झाला. "आम काटके नहीं चुसके खाने की बात है'', असे म्हणणाऱ्या धोनीला हापूस आंब्यापेक्षा पायरी जास्त आवडतो हे पक्के माहीत असल्याने देवगडच्या शेखर बोडसांच्या आमराईतील खास आंबे धोनीकरता घेऊन गेलो होतो. 

भेटलेल्या सर्व खेळाडूंनी लगेच निवडणुकांचे निकाल काय लागले विचारले. निकाल ऐकल्यावर, " हा सामना तर एकतर्फी झाला', अशी प्रतिक्रिया सगळ्यांनी व्यक्त केली. बंगालमधले निकाल ऐकून खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त केले. गौतम गंभीर निवडून आल्याचे समजल्यावर शिखर धवनने समाधान वाटल्याचे बोलत, "गौती भाई जरूर अच्छा काम करेंगे'', असे खात्रीने सांगितले. 

गुरुवारी रात्री संपूर्ण संघ विराट कोहलीने आयोजित केलेल्या क्रिकेट पुरस्कार समारंभाला हजर राहणार आहे. आजी माजी खेळाडूंचा मानसन्मान करायचा समारंभ ऐतिहासिक लॉर्डस्‌ मैदानावरील लॉंगरुममध्ये संपन्न होणार आहे. 

शुक्रवारी परत सराव करून मग शनिवारी भारतीय संघ पहिला सराव सामना ओव्हल मैदानावरच खेळणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या