क्रिकेट खेळण्यासाठी रायुडूला 'या' देशाची ऑफर

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी वेगवेगळ्या खेळाडूंची नावे चर्चेत असताना रायुडू या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार होता. पण एम. एस. के. प्रसाद यांनी रायुडूऐवजी विजय शंकरची अंतिम संघात निवड केल्याने तो नाराज झाला होता.

मुंबई : विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने नाराज झालेल्या अंबाती रायुडूने अखेर आज (बुधवार) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या अगोदरच सोमवारी (ता. 1) आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ऑफर दिली आहे. तसेच आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारावे, अशी विनंती देखील केली आहे. नागरिकत्वासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही आईसलँड क्रिकेट बोर्डाने त्याला दिली आहे. या संबंधीचे एक ट्विट आईसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर केले आहे.

आईसलँड क्रिकेटतर्फे करण्यात आलेल्या ट्विटवर रायुडूच्या चाहत्यांनी रायुडूच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी वेगवेगळ्या खेळाडूंची नावे चर्चेत असताना रायुडू या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार होता. पण एम. एस. के. प्रसाद यांनी रायुडूऐवजी विजय शंकरची अंतिम संघात निवड केल्याने तो नाराज झाला होता.  

विश्वकरंडक स्पर्धेत रायुडूऐवजी विजय शंकरची निवड करण्यात आल्यावर रायुडू नाराज झाला होता. सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळे विश्व करंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यावर त्याच्याजागी शंकरची निवड करण्यात आली. मात्र आता शंकरही दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने त्याच्याजागी मयांक अग्रवालला खेळविण्यात येणार असल्याचे वृत्त कळल्यानंतर रायुडूने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

भारत 'अ' संघातून खेळताना मयांकने गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये सर्वाधित धावा केल्या होत्या. याबद्दल राहुल द्रविड यांनी मयांकचे कौतुक केले होते. त्यामुळे मयांकला विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या