तेजस्विनीने साध्य केली ऑलिंपिक पात्रता
- भारताची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेतून 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातून ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली.
- माजी जगज्जेतेपदाबरोबर अन्य स्पर्धांतील पदकांचा अनुभव असलेल्या तेजस्विनीचे मात्र हे ऑलिंपिक पदार्पण असेल
दोहा - भारताची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेतून 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातून ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली. मात्र, तिला पदकापासून वंचित राहावे लागले.
माजी जगज्जेती असलेल्या तेजस्विनीने आशियाई स्पर्धेत आपल्या स्पर्धा प्रकारात अंतिम फेरी गाठून ही कामगिरी केली. टोकियो ऑलिंपिकसाठी भारताला मिळालेला हा 12 वा "कोटा' होता. या स्पर्धा प्रकारात अंतिम फेरी गाठलेल्या आठ स्पर्धकांनी यापूर्वीच ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली असल्यामुळे उपलब्ध तीनपैकी एक कोटा भारताला देण्यात आला.
महाराष्ट्रात क्रीडा अधिकारी असलेल्या 39 वर्षीय तेजस्विनीने 1171 गुणांसह पाचव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण तिला 435.8 गुणांसह चौथ्याच स्थानावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या फेरीनंतर तेजस्विनी तिसरी होती. पण नंतरच्या प्रयत्नांत ती मागे पडली. तिला 8.8 गुणांच्या पुढे जाता आले नाही.
चीनच्या मेंगयओ शी हिने 457.9 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. मंगोलियाच्या येसुगेन ओयुबॅट (457.0) हिने रौप्य, तर जपानच्या शिओरी हिराटा (445.9) हिने ब्रॉंझपदकाची कमाई केली. अन्य भारतीय स्पर्धकांमध्ये काजल सैनी 1167 गुणांसह 13 वी, तर गायत्री नित्यानंदम (1165) सोळावी आली.
----------------
तेजस्विनीची पहिलीच ऑलिंपिक वारी
टोकियो ऑलिंपिकसाठी आता तेजस्विनीचा भारतीय संघात समावेश होईल. माजी जगज्जेतेपदाबरोबर अन्य स्पर्धांतील पदकांचा अनुभव असलेल्या तेजस्विनीचे मात्र हे ऑलिंपिक पदार्पण असेल. तिला यापूर्वी 2008, 2012 आणि 2016 मध्ये ऑलिंपिक प्रवेशापासून दूर राहावे लागले होते. जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी तेजस्विनी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती.