जयपूरचे आव्हान संपल्यात जमा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

-घरच्या मैदानावर जयपूर पिंक पॅंथर्स संघाला आपला खेळ उंचावता आला नाही. घरच्या मैदानावरील शुक्रवारी अखेरच्या सामन्यात त्यांना तेलुगू टायटन्स संघाकडून 51-31 असा दारुण पराभव पत्करावा लागला

-या पराभवाने जयपूरचे आव्हान मात्र संपल्यात जमा झाले. त्यांचे आता दोनच सामने असून, त्यांचे 52 गुण आहेत.

-जयपूरच्या पराभवाचा फायदा आज पहिल्या सामन्यात बंगळूरकडून 35-33 असा पराभव पत्करावा लागलेल्या यु मुम्बा संघाला होईल.

जयपूर - घरच्या मैदानावर जयपूर पिंक पॅंथर्स संघाला आपला खेळ उंचावता आला नाही. घरच्या मैदानावरील शुक्रवारी अखेरच्या सामन्यात त्यांना तेलुगू टायटन्स संघाकडून 51-31 असा दारुण पराभव पत्करावा लागला. 
आव्हान संपुष्टात आलेल्या तेलुगू संघाला विजयाचे समाधान मिळाले. या पराभवाने जयपूरचे आव्हान मात्र संपल्यात जमा झाले. त्यांचे आता दोनच सामने असून, त्यांचे 52 गुण आहेत. जयपूरच्या पराभवाचा फायदा आज पहिल्या सामन्यात बंगळूरकडून 35-33 असा पराभव पत्करावा लागलेल्या यु मुम्बा संघाला होईल. अर्थात, त्यांना उर्वरित सामन्यात सातत्य राखावे लागेल यात शंका नाही. 
कर्णधार रोहित शिवाय खेळणाऱ्या बंगळुर बुल्स संघाने पवन कुमारच्या "सुपर टेन' कामगिरीच्या जोरावर आपला प्ले-ऑफमध्ये खेळण्याच्या आशा भक्कम केल्या. पवनला बंटीच्या सहा गुणांची साथ मिळाली. सौरभ नंदाल, सुमित सिंग, अमित शेरॉन यांची साथ मिळाली. मुंबईला अभिषेक सिंग (10) आणि अतुल शिवतारे (9) यांच्या खेळाचा फायदा करून घेता आला नाही. चढाईत 23-19 असे वर्चस्व राखल्यानंतरही बचावातील 7-10 हे अपयश आणि स्विकारावे लागलेले दोन लोण त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. 
तेलुगूचे तुफान 
या सामन्यानंतर झालेल्या लढतीत सिद्धार्थ देसाई आणि रजनिश या आक्रमकांच्या तुफानी चढायांनी तेलुगूने जयपूरचे आव्हान सहज परतवून लावले. सिद्धार्थने 19 चढायांत 22 गुण मिळवून जयपूरच्या बचावाला दुबळे केले. रजनिश यानेही "सुपर टेन' कामगिरी करताना त्याला मोलाची साथ केली. तेलुगूच्या चौफेर खेळाचा जयपूरला सामनाच करता आला नाही. त्यांचे आक्रमकही अपयशी ठरले आणि बचावालाही धार नव्हती. तेलुगूने चडाईत 33-22, बचावात 12-6 असे वर्चस्व राखताना तब्बल तीन लोण देत जयपूरला त्यांच्याच मैदानावर पूर्ण निष्प्रभ केले. त्यांचा कर्णधार दीपक हुडाची "सुपर टेन' कामगिरी हीच काय ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरली.


​ ​

संबंधित बातम्या