बार्बोराकडून पहिली ग्रँड स्लॅम यानास अर्पण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

फ्रेंच विजेतेपद जिंकल्यानंतर बार्बोरा क्रेजिकोव्हा हिला आठवण झाली ती मेंटॉर याना नोवोत्नाची. नोवोत्ना कर्करोगाशी अखेरची झुंज देत असताना बार्बरा तिच्यासह रुग्णालयात होती. बार्बोराने फ्रेंच विजेतेपदानंतर  आकाशाकडे बघत यानाचे आभार मानले.

पॅरिस - फ्रेंच विजेतेपद जिंकल्यानंतर बार्बोरा क्रेजिकोव्हा हिला आठवण झाली ती मेंटॉर याना नोवोत्नाची. नोवोत्ना कर्करोगाशी अखेरची झुंज देत असताना बार्बरा तिच्यासह रुग्णालयात होती. बार्बोराने फ्रेंच विजेतेपदानंतर  आकाशाकडे बघत यानाचे आभार मानले.

जागतिक क्रमवारीत ३३ व्या असलेल्या बार्बोराने रशियाच्या अॅनास्तासिया पॅवलीऊचेंकोवा हिला पराजित करून जेतेपद जिंकले. १९९८ च्या विम्बल्डन जेत्या याना नोवात्नाने बार्बोरास घडवले. नोवोत्नाचे २०१७ मध्ये कर्करोगाने निधन झाले.  

आमच्यातील नाते खूपच घट्ट होते. ती आजारी असल्याचे ऐकल्यावर मला खूपच धक्का बसला. तिच्या आजाराबाबत पूर्ण समजले. आमच्यातील नाते लवकर संपणार हे समजल्यावर मला अश्रू आवरले नाहीत. त्यातून सावरणे सोपे नव्हते. पण मी असले तर तिला पाठबळ मिळेल असेच मला वाटत होते, असे बार्बोराने सांगितले.

तिची प्रकृती खूप खालावली, त्यावेळी त्यास सामोरे जाणे अवघड झाले. ते पाहून आई-वडील मला रुग्णालयात जाण्यापासून रोखत होते. पण मला त्रास होत असूनही तिच्यासह रहायचे ठरवले. तिची जगण्याची जिद्द पाहूनच मला कायम लढत राहण्याची प्रेरणा मिळाली, असे बार्बोरा म्हणाली.

बार्बोरातील गुणवत्ता नोवोत्नाने हेरली आणि तिला २०१४ पासून मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. बार्बोराने २०१८ मध्ये विम्बल्डन तसेच फ्रेंच ओपनच्या दुहेरीत बाजी मारली. या विजेतेपदानंतर माझ्यात काहीही बदल होणार नाही. विजेते झाल्यावरही पाय जमिनीवरच असावेत. प्रत्येकाचे मनापासून स्वागत करावे, चांगली व्यक्ती होणेही महत्त्वाचे असते, असे तिने मला शिकवले आहे, असे बार्बोराने आवर्जून नमूद केले. 

मला जेवढा आत्ता आनंद होत आहे, त्यापेक्षा तिला (याना नोवात्ना) होत असेल. ती माझ्यासोबत सतत आहे, त्यामुळेच तर मी ग्रँड स्लॅम स्पर्धेत यशस्वी होत आहे. मी एकेरीत जिंकावे हे तिचे स्वप्न होते. या यशाचे महत्त्व तिच्यासाठी किती होते हे मी नक्कीच जाणते.
- बार्बोरा क्रेजिकोव्हा


​ ​

संबंधित बातम्या