एलिना स्वितोलिना सलग सातव्यांदा तिसऱ्या फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

`होम बॉस'' एलिना स्वितोलिना हिने फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सलग सातव्यांदा प्रवेश करताना सहज बाजी मारली. दरम्यान, गतउपविजेत्या सोफी केनिन हिनेही अपेक्षेनुसार आगेकूच केली.

पॅरिस - `होम बॉस'' एलिना स्वितोलिना हिने फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सलग सातव्यांदा प्रवेश करताना सहज बाजी मारली. दरम्यान, गतउपविजेत्या सोफी केनिन हिनेही अपेक्षेनुसार आगेकूच केली. 

एलिनाने अॅन ली हिचा ६-०, ६-४ असा पराभव केला. आता याच कोर्टवर तिचा भावी पती गेएल मेमफीस खेळणार आहे. तुमच्यात टेनिसवरून वाद होतात का, या प्रश्नावर एलिना म्हणाली. त्याला माझे ऐकावेच लागते. घरात मीच बॉस आहे. यावर कोर्टवरील कोणासही हसू आवरले नाही. लगेचच तिने मी जरा घाईत आहे. मला गेएलच्या सामना बघायचा आहे. तुम्ही त्याच्याविरोधात गेलात तर त्याला भक्कम साथ हवीच असणार. 

चौथ्या मानांकित केनिनने अमेरिकेच्याच हैली बाप्तिस्टे हिला ७-५, ६-३ असे हरवले. आता तिच्यासमोर अमेरिकेच्याच जेसिका पेगुला हिचे आव्हान असेल. अमेरिकेच्याच स्लोएन स्टीफन्स हिने नवव्या मानांकित कॅरोलिना पिस्कोवा हिचा ७-५, ६-१ असा पाडाव केला. स्टीफन्स २०१८ च्या स्पर्धेतील उपविजेती आहे. 

अॅस्त्रा शर्मा पराजित
ऑस्ट्रेलियाच्या अॅस्त्रा शर्माला तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑन्स जॅबेऊर हिच्याविरुद्ध २-६, ४-६ हार पत्करावी लागली. अॅस्त्राने चार्लेस्टन स्पर्धेतील अंतिम लढतीत ऑन्सला हरवले होते. त्याचे उट्टे जाहीर केल्याप्रमाणे ऑन्सने काढले.

बार्तीची माघार
अव्वल मानांकित अॅश्ले बार्ती हिने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बार्तीने पोलंडच्या मॅग्दा लिनेटेविरुद्ध ६-१, २-२ असे आघाडीवर असताना लढत सोडून दिली. डाव पाय दुखत असल्याचे तिने सांगितले.

दुहेरीची जोडी बाधित
पुरुष दुहेरीत सहभागी झालेली एक जोडी कोरोना चाचणीत पॉझिटिव ठरली आहे. स्पर्धेच्या नियमावलीनुसार त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आले आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून एकंदर २,४६६ चाचणी झाल्या आहेत. 

अंकिता, दिवीजची दुहेरीत हार
अंकिता रैना, तसेच दिवीज शरणचे दुहेरीतील आव्हान आटोपले. अंकिता आणि अमेरिकेची लॉरेन डेव्हीस यांना दहाव्या मानांकित ल्युसिया रादेक्स - लॉरा सिएगमंड यांच्याविरुद्ध ४-६, ४-६ हार पत्करावी लागली. अंकिता - लॉरेनला सातदा सर्व्हिस राखता आली नाही, तसेच त्यांनी पाचदा सर्व्हिस भेदली. दिवीज शरण आणि अर्जेंटिनाचा फेडेरिको देल्बॉनिस यांना मॅट रीड - अॅलेक्स डे मिनॉर या ऑस्ट्रेलियाच्या जोडीविरुद्ध ६-३, ६-७ (१३-१५), ४-६ अशी हार पत्करावी लागली.


​ ​

संबंधित बातम्या