विम्बल्डन स्पर्धेत मी खेळले हाच एक चमत्कार; ॲश्ले बार्ती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 July 2021

विम्बल्डन स्पर्धेत मी खेळले हाच एकच चमत्कार आहे. या स्पर्धेत मी खेळू शकेन असे माझ्या सपोर्ट स्टाफला एक महिना वाटत नव्हते, असे प्रथमच विम्बल्डन स्पर्धा जिंकलेल्या ॲश्ले बार्तीने सांगितले. तिने फ्रेंच स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती.

लंडन - विम्बल्डन स्पर्धेत मी खेळले हाच एकच चमत्कार आहे. या स्पर्धेत मी खेळू शकेन असे माझ्या सपोर्ट स्टाफला एक महिना वाटत नव्हते, असे प्रथमच विम्बल्डन स्पर्धा जिंकलेल्या ॲश्ले बार्तीने सांगितले. तिने फ्रेंच स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती.

विम्बल्डन स्पर्धा दोन महिन्यांवर असताना बार्तीला दुखापत झाली. यामुळे तिला किमान दोन महिने ब्रेक घ्यावा लागेल असेच तिच्या सपोर्ट स्टाफला वाटत होते; मात्र त्यांनी हे बार्तीपासून लपवून ठेवले होते. सपोर्ट स्टाफने दुखापतीची तीव्रता माझ्यापासून लपवून ठेवली होती. ही स्पर्धा खेळत असताना मला दुखापतीचा कोणताही त्रास झाला नाही याचे पूर्ण श्रेय त्यांनाच आहे. विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याचे माझे स्वप्न आहे याची त्यांना कल्पना होती. दुखापतीबाबत सुरुवातीसच मला सांगितले तर त्याचा माझ्यावर प्रतिकूल परिणाम होईल हाच विचार त्यांनी केला. कदाचित त्यामुळे मी माझ्या स्वप्नपूर्तीची तयारी केली असेल. आता या स्पर्धेत पूर्ण खेळणे हाच मला चमत्कार वाटत आहे, असे तिने सांगितले.

विम्बल्डन विजेतेपद जिंकणारी बार्ती ही ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू. यापूर्वी ही कामगिरी एवोनी गुलागाँग कॉली हिने केली होती. एवोनीच्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदाचा सुवर्णमहोत्सव ऑस्ट्रेलिया साजरा करीत असतानाच बार्तीने हे यश मिळवले. एवोनी यांनी परिधान केलेल्या ड्रेसपासून प्रेरणा घेत बार्तीने अंतिम सामन्यासाठी पोषाखाची निवड केली होती.

एवोनी यांना माझ्या कारकिर्दीत मोलाचे स्थान आहे. त्यांनी माझ्यासह अनेक महिला खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा दिली. त्यांनी विजेतेपदाचे अनेक अनुभव माझ्यासह शेअर केले आहेत. आता त्यांना नक्कीच भेटणार आहे. त्या वेळी मीही त्यांना काही सांगू शकेन, असेही बार्ती आवर्जून म्हणाली.

विम्बल्डन स्पर्धेच्या यापूर्वी जास्त कटू आठवणीच होत्या, आता चांगल्या आठवणी जास्त झाल्या आहेत असे बार्तीने सांगितले. आता तिचे लक्ष ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आहे. मला तंदुरुस्तीबाबत कोणतीही चिंता नाही. खेळात काही दुखापती असणारच. तो खेळाचाच भाग आहे, पण सर्वोत्तम सपोर्ट स्टाफ माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी कशाला चिंता करू असे ती म्हणाली.

टेनिस - क्रिकेट - टेनिस
बार्तीने १० वर्षांपूर्वी विम्बल्डन स्पर्धेत कुमारी एकेरीत बाजी मारली; मात्र त्यानंतर तीने टेनिसपासून ब्रेक घेतला आणि त्या वेळी ती व्यावसायिक क्रिकेटपटू झाली होती; मात्र पुन्हा टेनिसकडे वळली आणि त्यात यश मिळवले.


​ ​

संबंधित बातम्या