फेडररला मागे टाकत जोकोविचनं रचला नवा विश्वविक्रम

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 8 March 2021

एटीपीने जारी केलेल्या ताज्या रँकिंगनुसार, जोकोविच अव्वलस्थानी कायम राहिला आहे. 311 आठवड्यांपासून तो अव्वल स्थानावर आहे.  फेडरर 310 आठवडे अव्वलस्थानावर विराजमान होता.

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविचनं नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. एटीपी रँकिंगमध्ये सर्वाधिक काळ अव्वलस्थानी राहण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. यापूर्वी हा विक्रम स्वित्झर्लंडचा स्टार टेनिस स्टार  रॉजर फेडररच्या नावे होता. जोकोविचने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत जेतेपद पटकावले होते. दुसरीकडे रॉजर फेडरर दुखापतीमुळे पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या लढतीत कोर्टपासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले.  

एटीपीने जारी केलेल्या ताज्या रँकिंगनुसार, जोकोविच अव्वलस्थानी कायम राहिला आहे. 311 आठवड्यांपासून तो अव्वल स्थानावर आहे.  फेडरर 310 आठवडे अव्वलस्थानावर विराजमान होता. नव्या रँकिंगनंतर जोकोविचन प्रतिक्रियाही दिली आहे. ही गोष्ट दिग्गजांच्या मार्गावरुन प्रवास करत असल्याचा आनंद देणारी आहे, असे मत त्याने व्यक्त केले आहे. मी लहानपणापासून पाहत आललो स्वप्न पूर्ण झाले, असेही तो म्हणाला. 

एटीपी मास्टर्स 1000 मध्ये 36 ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या जोकोविचने 2011 मध्ये पहिल्यांदा अव्वल रँकिंग मिळवली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पाच टप्प्यात त्याने अव्वलस्थानी झेप घेतली होती.  फेडररने 16 जुलै 2012 मध्ये पीट सम्प्रास याचा 286 आठवडे अव्वलस्थानी राहण्याचा विक्रम मोडीत काढला होता. 33 वर्षीय जोकोविचने 21 मे 2018 मध्ये क्रमवारीत 22 व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. याच वर्षी त्याने 5 नोव्हेंबरला पुन्हा अव्वलस्थानावर झेप घेतली होती. फेडरर, राफेल नदाल आणि जिमी कोनोर्स पाच-पाच वेळा अव्वलस्थानी राहिले आहेत. जोकोविच मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाचव्यांदा अव्वलस्थानी विराजमान झाला. सध्याच्या घडीला त्याने हे स्थान कायम ठेवले आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या