जोकोविचचा झंझावात कायम; निशिकोरी निष्प्रभ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम करण्याची संधी असलेल्या अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने यजमान जपानच्या केई निशिकोरीच्या आशा संपुष्टात आणल्या. ऑलिंपिकमधील टेनिस स्पर्धेत जोकोविचने हा सामना ६-२, ६-० असा एकदमच एकतर्फी जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

टोकियो - ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम करण्याची संधी असलेल्या अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने यजमान जपानच्या केई निशिकोरीच्या आशा संपुष्टात आणल्या. ऑलिंपिकमधील टेनिस स्पर्धेत जोकोविचने हा सामना ६-२, ६-० असा एकदमच एकतर्फी जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

गत ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारा निशिकोरी जोकोविचसमोर आव्हानही उभे करू शकला नाही. ७० मिनिटांत जोकोविचने आपली मोहीम फत्ते केली. कमालीच्या उकाड्यात सामने खेळावे लागत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत आहे. ऐन दुपारी भर उकाड्यात सामने खेळविण्याऐवजी सकाळी लवकर सामन्यांची सुरुवात करावी, अशी मागणी टेनिसपटूंकडून करण्यात येत आहे. 

निशिकोरीचे पुरुषांच्या दुहेरीतील आव्हान कालच संपुष्टात आले होते. आज एकेरीत त्याच्यासमोर जोकोविच या तगड्या खेळाडूचे आव्हान असल्यामुळे कस लागणार याची जाणीव त्याला होती, परंतु आव्हानही उभे करण्यात आपण अपयशी ठरतोय हे लक्षात येताच त्याच्याकडून अधिक चुका होत गेल्या. या दोघांमध्ये एकूण १८ सामने झाले आहेत, त्यातील १६ लढतींत जोकोविचची सरशी झालेली आहे.

या सामन्यात निशिकोरीला आपली पहिलीच सर्व्हिस राखता आली नाही. त्यानंतर तो जोकोविचच्या सर्व्हिसवर गुण मिळविण्याचा प्रयत्न करत होता, मात्र निशिकोरीच्या एकूणच खेळाचा अंदाज आल्यावर जोकोविचने त्याला कोर्टभर नाचवले.


​ ​

संबंधित बातम्या