विम्बल्डन, ऑलिंपिकमधून राफेल नदालची माघार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

जागतिक क्रमवारीत तिसरा असलेल्या राफेल नदालने विम्बल्डन टेनिस स्पर्धा, तसेच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. वीस ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकलेल्या नदालने दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.

माद्रिद - जागतिक क्रमवारीत तिसरा असलेल्या राफेल नदालने विम्बल्डन टेनिस स्पर्धा, तसेच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. वीस ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकलेल्या नदालने दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.

विम्बल्डन, तसेच ऑलिंपिक माघारीचा निर्णय नक्कीच सोपा नव्हता. पण शरीराची हाक ऐकण्याचे ठरवले. त्याबाबत माझ्या टीमसह चर्चा केली. टेनिस कारकीर्द लांबवणे हे माझे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठीचा हा निर्णय घेतला आहे, असे नदालने सांगितले. सर्वोच्च स्तरावर सर्वोत्तम खेळ करणे हे माझे कायम लक्ष्य आहे. त्या स्पर्धात खेळल्याचा मला पुरेपूर आनंद लाभतो. हे खेळत असताना काही व्यावसायिक, तसेच वैयक्तिक लक्ष्य बाळगले आहे. ते साध्य करण्यासाठीही हा निर्णय घेतला आहे, असेही तो म्हणाला. 

फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचविरुद्ध पराजित झाल्यानंतर नदालने विम्बल्डन माघारीचे संकेत दिले होते. फ्रेंच ओपन तसेच विम्बल्डन या दोन स्पर्धांत फारसा ब्रेक नाही, याकडे नदालने लक्ष वेधले होते. प्रामुख्याने या दोन स्पर्धात तीन आठवड्यांचा ब्रेक असतो, पण यावेळी दोन आठवड्यांचेच अंतर आहे. फ्रेंच टेनिस स्पर्धा होत असताना पॅरिसमधील कोरोना निर्बंध कमी असावेत हाच विचार करून संयोजकांनी स्पर्धा एक आठवडा लांबवली होती.

खडतर क्ले टेनिस मोसमाची सांगता झाल्यानंतर दोन आठवड्यांतच विम्बल्डन खेळणे सोपे नाही. सध्या तरी यासाठी शरीर साथ देत नाही, असे त्याने सांगितले. नदाल जानेवारीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पराजित झाल्यानंतर एप्रिलच्या मध्यास सुरू झालेल्या क्ले कोर्टवरील स्पर्धात खेळला होता. त्याने २००८ च्या ऑलिंपिकमध्ये एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते, तर २०१६ च्या रिओ स्पर्धेत दुहेरीत बाजी मारली होती.


​ ​

संबंधित बातम्या