रॉजर फेडररची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

अॅश्ले बार्ती, नाओमी ओसाका यांच्यापाठोपाठ आता रॉजर फेडररनेही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपल्या टीमसह चर्चा केल्यानंतर फेडररने हा निर्णय घेतला असल्याचे संयोजकांनी जाहीर केले.

पॅरीस - अॅश्ले बार्ती, नाओमी ओसाका यांच्यापाठोपाठ आता रॉजर फेडररनेही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपल्या टीमसह चर्चा केल्यानंतर फेडररने हा निर्णय घेतला असल्याचे संयोजकांनी जाहीर केले. 

फेडररने तिसऱ्या फेरीत डॉमिनिक कोएपफेर याला ७-६ (७-५), ६-७ (३-७), ७-६ (७-४), ७-५ असे नमवले. ही प्रकाशझोतातील लढत शनिवारी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास संपली. चौथ्या फेरीची लढत मी खेळणार का, हे सांगणे अवघड आहे, अशी टिप्पणी त्याने केली होती. तो म्हणाला, मला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. गुडघ्यांवर किती ताण देणार, हा प्रश्‍नच आहे. 

चाळीशीतील फेडररच्या गुडघ्यावर गतवर्षी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विम्बल्डन जेतेपद त्याला खूणावत आहे. ही स्पर्धा २८ जूनपासून आहे. या स्पर्धेसाठीच त्याने फ्रेंच स्पर्धा अर्धवट सोडून दिली असल्याची चर्चा सुरु आहे. आता तो हॅले स्पर्धेत खेळणार आहे. तेथील विजेतेपदानंतर गुडबाय करण्याचा त्याचा विचार असल्याचे टेनिस अभ्यासकांचे मत आहे. यंदा तो तीन स्पर्धा खेळला आहे. प्रत्येक लढतीचा गुडघ्यावर किती ताण पडतो, हे लक्षात घेतो. लढतीच्या दिवशी माझा गुडघा कसा आहे, याचाही विचार करतो. लढत लांबल्यावर हा विचार जास्त गांभीर्याने करतो, असे तो म्हणाला. फेडररची तिसऱ्या फेरीची लढत साडेतीन तास चालली.  

झिदान्सेकचा पराक्रम
तॅमारा झिदान्सेक हिने ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेली पहिली स्लोवेकियाची टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. तिने रुमानियाच्या सॉराना सिर्स्ती हिला ७-६(७-४), ६-१ असे नमवले. यापूर्वी झिदान्सेक हिने कधीही ग्रँड स्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी पार केली नव्हती. तिने सहाव्या मानांकित बिआंका आंद्रेस्कू हिला हरवून स्पर्धेस धडाकेबाज सुरुवात केली होती. 

अॅनास्तिसिया पॅवल्युचेंको हिने दहा वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने व्हिक्टोरिया अझारेंकाचा ५-७, ६-३, ६-२ असा पाडाव केला. अॅनास्तिसियाने यापूर्वीच्या फेरीत तिसरी मानांकित आर्यना सॅबालेंका हिला पराजित केले होते.

माघारीवर संयोजकांकडून शिक्कामोर्तब
फेडररने शनिवारची लढत झाल्यावर रोलँ गॅरोवरील फिलिप चार्टर स्टेडियमचे छायाचित्र ट्विट केले होते. त्यासोबत शांततेसारखे दुसरे काही नसते, अशी टिप्पणी केली; तर संयोजकांनी फेडररच्या छायाचित्रासह अच्छा, लवकरच भेट होईल, अशी टिप्पणी केली होती. आता फेडररच्या माघारीची संयोजकांनी अधिकृत घोषणा केली. 

नदाल फेडररपेक्षा सरस
एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या स्पर्धेत राफेल नदालने फेडररला मागे टाकले. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत १०३ विजय मिळवत एका स्पर्धेत सर्वाधिक १०२ विजय मिळवण्याचा फेडररचा विक्रम मागे टाकला. आश्चर्य म्हणजे फेडररची ही कामगिरी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आहे.

सर्वाधिक विजय

  • १०३ राफेल नदाल, फ्रेंच ओपन
  • १०२ रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियन ओपन
  • १०० रॉजर फेडरर, विम्बल्डन
  • ९८ जिमी कॉनर्स अमेरिकन ओपन
  • ८९ रॉजर फेडरर अमेरिकन ओपन
  • १२९ मार्टिना नवरातिलोवा विम्बल्डन
  • १०६ सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन
  • १०१ ख्रिस एव्हर्ट अमेरिकन ओपन

​ ​

संबंधित बातम्या