सानिया- अंकिताची सलामी चेनोक भगिनींशी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 July 2021

ऑलिंपिकच्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व अंकिता रैना या जोडीला पहिल्या फेरीत युक्रेनच्या ल्यूडमील चेनोक आणि नाडिया चेनोक या भगिनींना सामोरे जावे लागणार आहे.

टोकियो - ऑलिंपिकच्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व अंकिता रैना या जोडीला पहिल्या फेरीत युक्रेनच्या ल्यूडमील चेनोक आणि नाडिया चेनोक या भगिनींना सामोरे जावे लागणार आहे.

ऑलिंपिकच्या टेनिस संघटनेकडून स्पर्धेच्या ४८ तासांआधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार भारताचा एकेरीतील टेनिसपटू सुमीत नागलचा पहिला सामना उझ्बेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनसोबत होणार आहे. हा अवघड अडथळा तो कसा पार करतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल; तर सर्बियाचा सुपरस्टार नोवाक जोकोविच त्याच्या ऑलिंपिक विजयी सलामीसाठी उत्सुक असेल. पहिल्या फेरीत त्याचा सामना बोलीव्हियाच्या हुगो डेलिनसोबत होईल.

घरच्या मैदानावर जपानसाठी टेनिसमधील पहिले सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असलेली निओमी ओसाकाची सलामीची लढत चीनच्या झेंग सेसाईसोबत होईल. पहिल्या फेरीतील या सर्व सामन्यांना स्थानिक वेळेनुसार शनिवारी ११ वाजता ‘एरिके टेनिस पार्क’वरून सुरुवात होणार आहे. 

महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणारी विम्बल्डन विजेती ऑस्ट्रेलियाची ॲश्ले बार्ती, स्पेनच्या सारा सोरीबस तोर्मोसोबतच्या सामन्यातून ऑलिंपिक पदार्पण करेल; तर पुरुष क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डॅनिल मेदवेदेवचा पहिला सामना कझाकस्तानच्या अलेक्झांडर बुल्बीकसोबत होईल; तर ब्रिटनचा अँडी मरेला ऑलिंपिकमधील सलग तिसरे विजेतेपद जिंकण्यासाठी कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासीचे पहिल्या फेरीत आव्हान असेल; तर रिओ एकेरीत ब्राँझ जिंकणारी चेक रिपब्लिकची पात्रा क्विटोवा इटलीच्या जस्मिन पावोलिनी हिच्याशी भिडणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या