सानिया-अंकिताची ऑलिंपिक क्रीडा टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच हार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

विजयी सलामी देण्याची संधी असताना सानिया मिर्झा सर्व्हिस राखू शकली नाही आणि त्यानंतर सानिया-अंकिताची सामन्यावरील पकडच निसटत गेली, त्यामुळे त्यांना ऑलिंपिक क्रीडा टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या सामन्यात पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली.

टोकियो/मुंबई - विजयी सलामी देण्याची संधी असताना सानिया मिर्झा सर्व्हिस राखू शकली नाही आणि त्यानंतर सानिया-अंकिताची सामन्यावरील पकडच निसटत गेली, त्यामुळे त्यांना ऑलिंपिक क्रीडा टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या सामन्यात पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली.

सानिया आणि अंकितास युक्रेनच्या निदिया आणि लिउदमीला या जुळ्या किचेनॉक भगिनींविरुद्ध ६-०, ६-७ (०-७), ८-१० अशी हार पत्करावी लागली. भारतीय जोडी एकतर्फी वर्चस्व राखणार असे वाटत असतानाच पराजित झाली.

पहिला सेट भारतीयांनी जिंकला होता. दुसऱ्या सेटमध्ये ५-३ आघाडी होती, त्या वेळी सानियाची सर्व्हिस होती. हीच लढत जिंकून देऊ शकणारा सर्व्हिस गेम सानियाने गमावला आणि चित्र बदलत गेले. या गेममध्ये १५-३० पिछाडीनंतर सानियाने बरोबरी साधली, पण त्यानंतर दोन चुका करीत गेम बहाल केला. 

यामुळे भारतीयांनी सामन्यात प्रथमच सर्व्हिस गमावली. युक्रेनच्या जोडीने हा सेट टायब्रेकरवर जिंकला. त्या टायब्रेकरमध्ये भारतीय एकही गुण जिंकू शकल्या नाहीत. भारतीय जोडीने सलग १५ गुण (दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमधील सात आणि सुपर टायब्रेकरमध्ये सुरवातीचे ८) कसे गमाविले हाच प्रश्न टेनिस अभ्यासकांना सलत आहे.

दुसरा सेट गमाविल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच भारतीय जोडी सुपर टायब्रेकरमध्ये ०-८ मागे पडली. भारतीयांनी कडवी लढत देत ८-८ बरोबरी साधली, पण त्यानंतरचे दोन गुण गमाविल्याने भारतीय जोडीचे आव्हान आटोपले. आता टेनिसमधील भारताच्या आशा सुमीत नागलवरच आहेत.


​ ​

संबंधित बातम्या