सेरेना विल्यम्सची फ्रेंच टेनिस स्पर्धेत विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

सेरेना विल्यम्सने फ्रेंच टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देताना प्रथमच प्रकाशझोतात सुरू झालेल्या लढतीत बाजी मारली. दरम्यान, पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना हीने दुसऱ्या सेटमधील २-५ पिछाडीनंतर दोन सेटमध्येच विजय मिळवला.

पॅरिस - सेरेना विल्यम्सने फ्रेंच टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देताना प्रथमच प्रकाशझोतात सुरू झालेल्या लढतीत बाजी मारली. दरम्यान, पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना हीने दुसऱ्या सेटमधील २-५ पिछाडीनंतर दोन सेटमध्येच विजय मिळवला.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या स्पर्धेच्या वेळी काही लढती प्रकाशझोतात पूर्ण झाल्या होत्या, पण यंदापासून लढतीची सुरुवातच प्रकाशझोतात होत आहे. या लढतींच्या वेळी प्रेक्षकांना प्रतिबंध होता. त्यातील सेरेनाची लढत स्थानिक वेळेनुसार इरिना कॅमेला बेगू ७-६ (८-६), ६-२ असा विजय मिळवला. हा विजय तिने मी कधीही थांबणार नाही असा संदेश देत मिळवला.

सेरेनाची सर्व्हिस प्रभावी होती, तसेच तिच्या हालचालीही वेगवान होत्या. तिने संधी मिळताच नेटजवळ धाव घेतली. सेट पॉइंट वाचवण्याचे आव्हान असतानाही तिची आक्रमकता कमी झाली नाही. अर्थात काही चाहत्यांचे तिच्या शूजवरील तसेच ड्रेसवरील आरजी या अक्षरांकडे तसेच ऑलिम्पिया या मुलीच्या नावाकडे लक्ष वेधले गेले. त्याचबरोबर मी कधीही थांबणार नाही, तसेच मी कधीही हार मानणार नाही अशा अर्थाची वाक्ये फ्रेंचमध्ये लिहिली होती. 

तीनदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या स्वितोलिना हिने फ्रान्सची नवोदित खेळाडू ओशिन बाबेल हिला ६-२, ७-५ असे पराजित केले. तिची आता लढत अमेरिकेच्या अॅन ली हिच्याविरुद्ध होईल. मार्चनंतर प्रथमच स्पर्धात्मक लढत खेळणाऱ्या अॅन ली हिने केवळ एक गेम गमावत रशियाच्या मार्गारिटा गॅस्पार्यान हिला हरवले.

ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेत्या जेनीफर ब्रॅडी हिने अॅनास्तासिजा सेवास्तोवा हिला ६-३, ६-३ असे हरवले. १७ व्या मानांकित मारिया सॅकारी युक्रेनच्या कॅटारिना झॅवात्सका हिला ६-४, ६-१ असे पराजित केले.


​ ​

संबंधित बातम्या