ओसाका प्रकरणावर महिला कर्णधार मितालीचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

पत्रकार परिषद आणि त्यामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते म्हणून बंडखोरी करत थेट फ्रेंच ओपन स्पर्धेतून नावोमी ओसाकाने माघार घेतली; परंतु भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राजने मीडियाचा पाठिंबा आमच्यासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले.

मुंबई - पत्रकार परिषद आणि त्यामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते म्हणून बंडखोरी करत थेट फ्रेंच ओपन स्पर्धेतून नावोमी ओसाकाने माघार घेतली; परंतु भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राजने मीडियाचा पाठिंबा आमच्यासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले. 

भारतीय महिला संघ उद्या आव्हानात्मक इंग्लंड दौऱ्यावर रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत महिला कसोटी कर्णधार मिताली राजने मीडियाबाबत (प्रसिद्धिमाध्यम) विचारलेल्या प्रश्नावर आपले मत ठामपणे मांडले. 

महिला स्टार टेनिसपटू ओसाकाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदांना आपण उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर तिने स्पर्धेतून माघारीचा पर्याय निवडला; पण भारतीय महिला कर्णधार मिताली तीन वर्षांपूर्वी उभा वाद झालेले प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासह पत्रकार परिषदेस उपस्थित राहिली आणि आत्मविश्वासाने उत्तरेही दिली.

विलगीकरणाचे हे दिवस आव्हानात्मक आहेत; परंतु आम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत. मीडियाच्या बाबतीत सांगायचे तर त्यांनी केलेल्या सूचना आम्हाला वेळोवेळी प्रगती करण्यास उपयोगी ठरतात, असे मिताली म्हणाली.

तीन वर्षांपूर्वी मिताली कर्णधार असताना त्यावेळीही मार्गदर्शक असेल्या रमेश पोवार यांच्यात वाद झाला होता. त्याची परिणती पोवार यांना पद सोडण्यात झाली होती; परंतु हेच दोघे पुन्हा त्यांच्या त्यांच्या पदावर आले आहेत. याबाबत विचारले असता मितालीने तो भूतकाळ होता, मागचे विसरून आयुष्यात पुढे जायचे असते. आम्हीही तेच केले आहे, असे उत्तर दिले; तर पोवार म्हणाले, आम्ही सर्व जण व्यावसायिक आहोत. त्या त्या वेळच्या घटना विसरून संघासाठी एकत्र यायचे असते आणि संघाची हित जपायचे असते.


​ ​

संबंधित बातम्या