इतिहासाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान - जोकोविच

सुनंदन लेले
Tuesday, 15 June 2021

त्सिस्तिपासचे कडवे आव्हान मोडून दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचने या विजेतेपदाबाबत व्यक्त केलेली भावना आणि प्रतिस्पर्ध्यांबाबत दाखवलेला आदर...

त्सिस्तिपासचे कडवे आव्हान मोडून दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचने या विजेतेपदाबाबत व्यक्त केलेली भावना आणि प्रतिस्पर्ध्यांबाबत दाखवलेला आदर...

चारही ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा किमान दोन वेळा जिंकण्याबाबत
जोकोविच : आधुनिक जमान्यात चारही ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा किमान दोन वेळा जिंकण्याची कामगिरी माझ्याकडून झाली, ज्याचे मला समाधान आहे. ज्या खेळावर मी प्रचंड प्रेम करतो त्या खेळाच्या इतिहासाचा साक्षीदार झाल्याचा सार्थ अभिमान वाटतो. ४८ तासांमध्ये  लाल मातीच्या कोर्टवर नदाल विरुद्धची लढत साडेचार तास लढत देऊन जिंकणे आणि अंतिम सामन्यात परत साडेचार तासांची लढत त्सित्सिपास विरुद्ध जिंकणे ही कमाल होती.

अंतिम सामन्याबद्दल
जोकोविच : अंतिम सामन्यात त्सित्सिपास सुरुवातीपासून जोर लावेल याचा मला अंदाज होता. दुसऱ्या सेटमध्येही मी योग्य शारीरिक आणि मानसिक अवस्थेत नव्हतो. त्याचा मला फटका बसला. लढत देणे आपल्याला जमणार नाही अशी भावना निर्माण होत होती... पण दुसरे मन सकारात्मक विचारांनी जागे करणे गरजेचे होते. त्यानंतर मी कोर्टबाहेर जाऊन कपडे बदलून काहीसा ताजातवाना होऊन आलो. थोडी लय सापडली. मग माझे फटके बसू लागले आणि त्याचा परिणाम त्सित्सिपासच्या विचारांवर झाला. मग मला मनासारखा खेळ करणे शक्य झाले, तीच लय मी पकडून ठेवली.

लहान मुलाला रॅकेट देण्याबाबत
जोकोविच : सामना संपल्यावर मी लहान मुलाला जाऊन माझी सामना जिंकलेली रॅकेट दिली. तो मुलगा संपूर्ण सामन्यात मला आवाजी पाठिंबा देत होता. सतत मला प्रोत्साहन देत होता. तो मुलगा मधूनच मला पहिली सर्व्हिस बरोबर कर... त्याच्या बॅकहँन्डला जास्त खेळ...सर्व्हिस होल्ड कर अशा सूचनाही देत होता. जणू काही तो मला योजना सांगताना प्रशिक्षण देत होता. मला ते मनाला खूप भावले म्हणूनच सामना संपल्यावर मी आभार मानायला त्याला रॅकेट प्रेमाने दिली.

१९ ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदांबद्दल
जोकोविच : पीट सॅम्प्रस, फेडरर किंवा नदालच्या विजेतेपदांच्या यादीकडे बघायचो तेव्हा मोठ्या स्पर्धा जिंकणे मला अशक्य वाटायचे नाही. सुरुवातीचा काळ अनुभव जमा करण्यात घालवल्यावर मी शारीरिक तयारीबरोबर मानसिक तयारीचे महत्त्व जाणले आणि त्यावरही भरपूर काम करून लागलो. मी कोणाचाही पाठलाग करत नाहीये. फेडरर आणि नदाल अजूनही खेळत आहेत, संधी सगळ्यांना आहे. मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करतो आहे इतकेच.


​ ​

संबंधित बातम्या