विम्बल्डनमध्ये दोन सामन्यांत फिक्सिंगचा संशय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

विशिष्ट प्रकारे आणि संशयास्पद पद्धतीने सट्टेबाजी झाल्यामुळे विम्बल्डनमधील दोन सामन्यांत फिक्सिंग झाली असल्याचा संशय जर्मनीतील एका वर्तमानपत्राने व्यक्त केला, त्यानंतर त्या दोन सामन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लंडन - विशिष्ट प्रकारे आणि संशयास्पद पद्धतीने सट्टेबाजी झाल्यामुळे विम्बल्डनमधील दोन सामन्यांत फिक्सिंग झाली असल्याचा संशय जर्मनीतील एका वर्तमानपत्राने व्यक्त केला, त्यानंतर त्या दोन सामन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संशय व्यक्त करण्यात आलेल्या दोन सामन्यांत एक सामना पुरुषांच्या दुहेरीतील पहिल्या फेरीचा आहे आणि एक सामना पुरुष एकेरीचा आहे. जर्मनीतील `डाय वायत` या वर्तमानपत्राच्या या वृत्ताने टेनिसविश्वात खळबळ उडाली आहे. 

त्यांच्या वृत्तानुसार पुरुषांच्या पहिल्या फेरीतील दुहेरीच्या एका सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात थेट सट्टेबाजी सामना जिंकण्याची अधिक संधी असलेल्या जोडीसाठी होत होती. ही जोडी पहिला सेट जिंकल्यावर हे सर्व घडत होते, त्यांच्या बाजूने अधिक सट्टेबाजी सुरू झाल्यावर मात्र पुढचे तीन सेट त्यांनी गमावले.

फिक्सिंगचा संशय असलेल्या दुसऱ्या सामन्याबाबतही असेच घडले. या सामन्यात दुसऱ्या सेटच्या अखेरच्या क्षणी अचानक बेटिंग वाढले. एकूण सर्व्हिस, बिनतोड सर्व्हिस किती केल्या जातील यावरही सट्टा लावला जात होता आणि सट्टेबाजीतील आकडेवारी आणि सामन्यातील सर्व्हिसची आकडेवारी तंतोतंत जुळली, त्यामुळे हा सामनाही फिक्स असल्याचा संशय या वर्तमानपत्राने व्यक्त केला आहे.

टेनिसमधील फिक्सिंग आणि गैरप्रकारासाठी लढा देणारी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या भ्रष्टाचार विरोध समितीने या सामन्यांच्या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. यंदाच्या वर्षात जानेवारीपासून त्यांच्याकडे एकूण ३४ अलर्ट आलेले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या