वारसा टिकविण्यासाठी त्सित्सिपासची धडपड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

‘आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला अनमोल वारसा जपणे, त्यांनी केलेले पराक्रम कधीही न विसरणे’ ही ग्रीसची परंपरा. तीच पुढे वाढविण्याचा व भूतकाळात आपल्या पूर्वजांनी ऑलिंपिकमध्ये केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न ग्रीसचा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास करीत आहे.

टोकियो - ‘आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला अनमोल वारसा जपणे, त्यांनी केलेले पराक्रम कधीही न विसरणे’ ही ग्रीसची परंपरा. तीच पुढे वाढविण्याचा व भूतकाळात आपल्या पूर्वजांनी ऑलिंपिकमध्ये केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न ग्रीसचा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास करीत आहे. 

त्सित्सिपासचे आजोबा सर्गेई साल्नीकोव्ह १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक स्पर्धेत सोव्हिएत महासंघाच्या फुटबॉल संघाचे सदस्य होते. त्याचवेळी त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम रचला होता. त्सित्सिपासची आई रशियन व वडील ग्रीक तर आजोबा सेर्गेई यांचेही मूळ ग्रीसमधीलच.

त्सित्सिपासनेही अनेकदा बोलताना, ग्रीसने कशाप्रकारे १८९६ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन केले याचा उल्लेख केलेला आहे. या स्पर्धेनेच देशातील नव्या दमाच्या अनेक खेळाडूंच्या पिढीचा पाया रोवला. त्सित्सिपासही त्यातीलच एक. नंतर २००४ ला जेव्हा ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन झाले, तेव्हा त्सित्सिपास केवळ सहा वर्षांचा होता.

या स्पर्धेतील खेळाडूंना खेळताना पाहातच त्याला टेनिसचे धडे मिळाले. आता यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या आजोबांनी दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी त्सित्सिपास उत्सुक असेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या त्सित्सिपासने ऑलिंपिकच्या पहिल्या फेरीत आपल्या लौकिकास साजेशी खेळी करत अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोचा ६-३,६-४ असा पराभव केला. 

या विजयाने त्याने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतील पराभवाचा एकप्रकारे वचपा काढला. २२ वर्षीय त्सित्सिपासने यंदाचा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अव्वल नोवाक जोकोविच याला चांगलीच स्पर्धा दिली होती; परंतु तिथे त्याला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. यंदाच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये मिश्र दुहेरीतही ग्रीक सहकारी मारिया सक्कारीसोबत तो उतरणार आहे. त्सित्सिपासला तिथेही पदकाची संधी आहे.

अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोच्या विरोधातील पहिल्या सामन्यात त्सित्सिपासने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत वर्चस्व राखले. बंदिस्त मैदानात झालेला हा सामना त्सित्सिपाससाठी पूरक ठरला. त्सित्सिपासनेही या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत नऊ बिनतोड सर्व्हिस नोंदविल्या. त्याबदल्यात टिआफो केवळ तीनच बिनतोड नोंदवू शकला.

उपांत्यपूर्व  फेरीसाठी त्याच्या लांबसोड केसांना निळ्या रंगाची रिबीन बांधून त्सित्सिपास कोर्टवर उतरला मात्र फ्रान्सच्या युगो हुंबर्टने  त्याचा २-६,७-६,६-२ असा पराभव केला. एकेरीत आव्हान संपुष्टात आले असले तरी मिश्र दुहेरीत आजोबांची बरोबरी साधण्याचा तो प्रयत्न करेल हे नक्की.


​ ​

संबंधित बातम्या