विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला मानांकितांची पडझड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

फ्रेंच स्पर्धेप्रमाणेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत आघाडीच्या महिला टेनिसपटूंची पडझड सुरू आहे. त्यामुळे आघाडीच्या दहा खेळाडूंपैकी तिघींचेच आव्हान कायम आहे. तिसरी मानांकित एलिना स्वितोलिना तसेच चौथ्या मानांकित सोफिया केनिनला गाशा गुंडाळावा लागला.

लंडन - फ्रेंच स्पर्धेप्रमाणेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत आघाडीच्या महिला टेनिसपटूंची पडझड सुरू आहे. त्यामुळे आघाडीच्या दहा खेळाडूंपैकी तिघींचेच आव्हान कायम आहे. तिसरी मानांकित एलिना स्वितोलिना तसेच चौथ्या मानांकित सोफिया केनिनला गाशा गुंडाळावा लागला. 

अव्वल मानांकित अॅश्ले बार्तीने दुसरी फेरी पार करताना अॅना ब्लिंकोवा हीला ६-४, ६-३ असे हरवले. बार्तीची सर्व्हिस सदोष होती, पण प्रतिस्पर्धीच्या चूका तिच्या पथ्यावर पडल्या.

जोरदार वारे तसेच पोलंडच्या मॅक्दा लिनेट हिचा सामना करण्यास स्वितोलाना अपयशी ठरली आणि ती एका तासात ३-६, ४-६ अशी हार पराजित झाली. सोळा मिनिटातच स्वितोलिना १-४ मागे पडली, त्यानंतर तिची पिछेहाट झाली. 

चौथी मानांकित सोफिया केनिन जागतिक क्रमवारीत ८२ व्या असलेल्या मॅडिसन ब्रँगल हिच्याविरुद्ध पराजित झाली. माजी ऑस्ट्रेलियन विजेती केनिन २-६, ४-६ अशी पराजित झाली. तिला ४१ सदोष फटक्यांचा फटका बसला. 

द्वितीय मानांकित आर्यना सॅबालेंका हिने ब्रिटनच्या कॅटी बॉल्टर हीला ४-६, ६-३, ६-३ असे हरवले. सातवी मानांकित इगा स्विआतेक आणि आठवी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा यांनी एकही सेट न गमावता आगेकूच केली. 

ग्रँड स्लॅम स्पर्धात खेळणारी पहिली अरब टेनिसपटू ऑन जॅबेऊर हिने तिसरी फेरी गाठताना व्हिनस विल्यम्सला ७-५, ६-० असे हरवले. व्हिनसविरुद्ध खेळताना सुरुवातीस नर्व्हस होते. मात्र त्यातून सावरत मोलाचा विजय मिळवला, असे जॅबेऊरने सांगितले. 

सानियाचा सनसनाटी विजय 
सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी मॅत्तेक हिच्या साथीत खेळताना महिला दुहेरीच्या सलामीच्या फेरीत सनसनाटी विजय नोंदवला. त्यांनी दासिरे क्रावझि -अॅलेक्सा गुराची या सहाव्या मानांकित जोडीस ७-५, ६-३ असे हरवले. दीड तास चाललेल्या लढतीत पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये बेथानीला सर्व्हिस राखताना प्रयास पडले, पण सात ड्यूसनंतर बेथानी - सानियाने गेम जिंकला आणि खेळ उंचावत गेला.


​ ​

संबंधित बातम्या