भारत-पाक लढतीचा निर्णय नाहीच
भारतीय टेनिस संघटनेबरोबर कोणतीही चर्चा न करता आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या ठिकाणाचा अंतिम निर्णय होणार आहे.
मुंबई / नवी दिल्ली - भारतीय टेनिस संघटनेबरोबर कोणतीही चर्चा न करता आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या ठिकाणाचा अंतिम निर्णय होणार आहे. डेव्हिस कप समितीच्या बैठकीत याबाबत आता सर्व काही ठरेल, असे आता सांगितले जात आहे.
भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता होणारी बैठक मंगळवारी संध्याकाळी साडेसातपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र ही बैठक आम्ही पुन्हा सांगेपर्यंत रद्द झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कळवले आहे. आता डेव्हिस कप समितीच याबाबतचा निर्णय घेईल, असे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने सांगितले असल्याचे भारताचे कर्णधार महेश भूपतीने सांगितले.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाची अतर्गत बैठक होणार असल्यामुळे सोमवारची बैठक एक दिवस लांबणीवर टाकण्यात आली होती, असे भारतीय टेनिस संघटनेच्या सूत्रांनी सांगितले होते. आता या बैठकीत भारत - पाकिस्तान लढतीबाबत डेव्हिस कप समितीच्या बैठकीत चर्चा होणे योग्य होईल असे ठरले असल्याचे सांगितले जात आहे. आयटीएफची उद्या लंडनला बैठक होईल आणि त्यात भारत - पाकिस्तान लढतीबाबत चर्चा होण्याची शक्यता टेनिस संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. पाकिस्तानने भारताच्या राजदूतांना मायदेशी पाठवले होते तसेच रेल्वे आणि बससेवा रद्द केली होती. मात्र आता यात काही दिवसात फरक पडले आणि त्यामुळे भारतीय संघटनेच्या पाकिस्तानात न खेळण्याच्या भूमिकेतील हवाच निघून जाईल, असा विचार आयटीएफचे पदाधिकारी करीत असावेत अशी भिती टेनिस संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात का खेळायचे नाही हे आम्ही आयटीएफ पदाधिकाऱ्यांना पटवून देणार होतो. मात्र, त्यांच्याबरोबर बैठकच होऊ शकली नाही. आता डेव्हिस कप समितीच या संदर्भात सुवर्णमध्य काढू शकेल असा आम्हाला विश्वास आहे.
-हिरोन्मय चटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव