टोकियो ऑलिंपिक लांबणीवर? ऑलिंपिकमंत्र्यांचेच संकेत

वृत्तसंस्था
Wednesday, 4 March 2020

कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर जगभरात प्रसार होत असतानाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार होण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या वर्षअखेरपर्यंत आम्ही घेऊ शकतो, असे जपानच्या ऑलिंपिकमंत्र्यांनी सांगितल्यामुळे स्पर्धेबाबत अनिश्‍चितता वाढली आहे.

टोकियो : कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर जगभरात प्रसार होत असतानाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार होण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या वर्षअखेरपर्यंत आम्ही घेऊ शकतो, असे जपानच्या ऑलिंपिकमंत्र्यांनी सांगितल्यामुळे स्पर्धेबाबत अनिश्‍चितता वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅश यांनी कोरोनाचा प्रसार वाढला असला तरी स्पर्धा पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार होईल, असे सांगितले आहे. स्पर्धेचे यजमान जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांच्यातील करारानुसार स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे असतो, पण त्याचवेळी या करारानुसार स्पर्धा 2020 मध्ये घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे या करारातच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे ऑलिंपिक मंत्री सैको हाशीमोतो यांनी जपानमधील संसदेत सांगितले. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 24 जुलैपासून होणार असल्याचे ठरले आहे.

आम्ही स्पर्धा पूर्वनिश्‍चित कार्यक्रमावर घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यालाच आमची पसंती आहे, असेही हाशीमोतो यांनी सांगितले. अर्थात त्यांनाही परिस्थिती यास पूर्ण अनुकूल नाही याची जाणीव आहे. यापूर्वीच ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक संयोजकांनी व्हीलचेअर रग्बी चाचणी स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. ही स्पर्धा 12 ते 15 मार्चदरम्यान होणार होती. पॅराऑलिंपिकची पात्रता स्पर्धा समजली जाणारी बोकिया स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिंपिकची वातावरण निर्मिती मॅरेथॉन स्पर्धेने होईल, असे मानले जात होते, पण ही मॅरेथॉन अव्वल ऍथलीटपुरतीच मर्यादित करण्यात आली. जे लीग अर्थात जपान फुटबॉल लीगमधील लढती 15 मार्चपर्यंत स्थगित आहेत. बेसबॉल लीगपूर्वी होणाऱ्या सराव लढती बंदिस्त दाराआड प्रेक्षकांविना होत आहेत. आश्‍चर्य म्हणजे स्पोर्टस्‌ क्‍लायबिंगची चाचणी स्पर्धा पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार शुक्रवारी होणार आहे. जपानमध्ये कोरोनाची लागण आत्तापर्यंत एक हजार जणांना झाली आहे, त्यामुळे बारा जणांचे निधन झाले आहे.

135 हजार कोटी येन पणास
- टोकियो ऑलिंपिकसाठी 135 हजार कोटी येनचे (12.51 अब्ज डॉलर) अंदाजपत्रक आहे.
- त्यातील बारा हजार कोटी येन हे स्टेडियम उभारणीसाठी.
- तीन हजार कोटी येन पॅराऑलिंपिकसाठी आहेत.
- संयोजनाच्या या खर्चात सापोरा येथे होणाऱ्या चालण्याच्या तसेच मॅरेथॉनसाठी होणाऱ्या तीन अब्ज येनचा खर्च नाही.
- नव्या नॅशनल स्टेडियमच्या उभारणीवरच सरकारचे दीडशे अब्ज येन खर्च.
- संयोजनासाठीच 2013 ते 2018 दरम्यान 106 हजार कोटी येन खर्च झाल्याचाही आक्षेप.
- स्पर्धेसाठी स्थानिक पुरस्कर्त्यांकडून 3 अब्ज डॉलरची कमाई अपेक्षित.
- टोयोटा, ब्रिजस्टोन, पॅनासोनिक, सॅमसंग यांचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीसह कोट्यवधी डॉलरचे करार, त्यातही संयोजकांचा सहभाग
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी 80 कोटी डॉलरचा विमा.
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने प्रत्येक संयोजन शहरात केलेल्या 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीसाठीचा हा विमा.
- टोकियो ऑलिंपिकसाठी एकंदर 2 अब्ज डॉलरचा विमा काढला असल्याची अर्थतज्ज्ञांचा अंदाज.


​ ​

संबंधित बातम्या