World Cup 2019 : सुरवात दणदणीत करा, तरच जिंकाल; नाहीतर..

सुनंदन लेले 
Friday, 5 July 2019

2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत कोण चार संघ पोहोचणार याचा अंदाज जवळपास नक्की झाला आहे. शेवटच्या काही साखळी सामन्यात स्पर्धेत कमजोर कामगिरी केलेल्या संघांनी तगड्या संघांना पराभूत केले तरच थोडे चित्रं पालटेल आणि क्रमवारी थोडी बदलेल. अन्यथा 99% उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला न्युझीलंड विरुद्ध आणि भारताची लढत इंग्लंड विरुद्ध होईल. 

वर्ल्ड कप 2019 : 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत कोण चार संघ पोहोचणार याचा अंदाज जवळपास नक्की झाला आहे. शेवटच्या काही साखळी सामन्यात स्पर्धेत कमजोर कामगिरी केलेल्या संघांनी तगड्या संघांना पराभूत केले तरच थोडे चित्रं पालटेल आणि क्रमवारी थोडी बदलेल. अन्यथा 99% उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला न्युझीलंड विरुद्ध आणि भारताची लढत इंग्लंड विरुद्ध होईल. 

न्युझीलंड संघाने झकास खेळ करून पहिले काही सामने ज्या तडफेने जिंकले ते बघता नंतर त्यांची इतकी वाताहत होईल असे वाटले नव्हते. तरीही स्पर्धेतील पहिल्या काही सामन्यात विजय मिळवल्याची पुण्याई त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाताना दिसत आहे. न्युझिलंड संघाचा अपवाद वगळता उरलेल्या तीन संघांच्या यशाला सलामीच्या फलंदाजांनी केलेली चांगली सुरवात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

भारतीय संघाच्या मोहिमेला गती मिळाली ऑस्ट्रेलिया सामन्यात. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि रोहित शर्माने भन्नाट खेळ केला. शिखर धवनचे शतक आणि रोहितच्या अर्धशतकाने चांगली भागीदारी सलामीला रचली गेल्यावर मोठी धावसंख्या उभारणे कठीण गेले नाही. त्या उलट ऑस्ट्रेलियाची सलामी रंगली नाही. भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवता आला आणि चांगल्या खेळाची लय सापडली. नंतर शिखरला दुखापत झाली आणि पुढील दोन सामन्यात रोहित शर्माला अपेक्षित साथ लोकेश राहुल देऊ शकला नाही. भारतीय संघ अडखळत खेळलेल्या सामन्यात सलामीची भागीदारी झाली नसल्याचे दिसते. 

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने जबरदस्त सलामी दिल्यावर त्यांना इंग्लंडविरुद्ध विजयाचा मार्ग सहजी सापडला. तीच गोष्ट जेसन रॉय - जॉनी बेअरस्टॉच्या जोडीची आहे. इंग्लंड संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागले जेव्हा जेसन रॉय दुखापतीने त्रस्त झाला आणि त्याची जागा जेम्स विंचला मिळाली. विंचला काहीच ठसा उमटवता आला नाही आणि इंग्लंड संघाने पराभवाच्या गटांगळ्या खाल्ल्या. जेसन रॉय बरोबर भारतासमोरच्या महत्त्वाच्या सामन्यात संघात परतला तेव्हा इंग्लंड संघाचे नाक पाण्याबाहेर आले. 

सलामीच्या जोडीच्या कामगिरीवर इंग्लंड संघ विसंबून असल्याचे जाणवू लागले आहे. मान्य आहे की आमची फलंदाजी खूप खोलवर आहे, पण जर सुरवातीला फलंदाज बाद झाले तर नंतरचे तेच फलंदाज खूप मोठी मजल मारू शकतील अशी खात्री देता येणार नाही, इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन म्हणाले. 

भारतीय संघाची बात थोडी वेगळी आहे. रोहित शर्मा अफलातून फॉर्ममधे फलंदाजी करतो आहे. रोहितने 8 सामन्यात चार शतके आणि ऑस्ट्रेलिया समोर मोलाचे अर्धशतक ठोकले आहे. लोकेश राहुलने अफलातून लय दाखवली नसली तरी चमक दाखवली आहे. गेल्या सामन्यातील 77 धावांची खेळी राहुलला आत्मविश्वास परत मिळवायला मोठी मदत करेल असे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

वेस्ट इंडीजचे महान गोलंदाज मायकेल होल्डींग त्याच मुद्दयावर बोट ठेवताना म्हणाले,"चर्चा सलामीच्या फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची चालू आहे त्यातच मला गोलंदाजांकरता संधी दिसते आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यात संयोजकांनी कितीही फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या बनवल्या तरीही मला वाटते वेगवान गोलंदाजांना फलंदाजांना बाद करायची संधी राहणारच. रॉय - बेअरस्टॉ आणि फिंच- वॉर्नर दोनही जोड्या डावाच्या सुरुवातीला धोका पत्करून फटके मारतात. त्यामानाने भारताचे सलामीचे फलंदाज थोडे चांगले तंत्र दाखवत आहेत. म्हणजेच वेगवान गोलंदाजांनी योग्य टप्पा दिशा ठेवला आणि थोडी नशिबाची साथ गोलंदाजांना लाभली तर फलंदाज बाद होण्याची शक्‍यता वाढते. सांग बुमरा - शमीला की होल्डींग असे म्हणत होते, होल्डींगने खास कॅरेबीयन शैलीत सांगितले. 

उपांत्य सामन्याची तयारी करताना संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सलामीच्या फलंदाजांना रोखायला नव्हे तर बाद करायला वेगवान गोलंदाजांना प्रोत्साहन देणार असेच चित्र समोर यायला लागले आहे.


​ ​

संबंधित बातम्या