हरियानाचा बचाव मुंबईकडून उद्‌ध्वस्त

संजय घारपुरे
Monday, 14 October 2019

-यु मुम्बा, बंगळूर बुल्स उपांत्य पेरीत
-यु मुम्बाचा हरियाना स्टिलर्सवर 46-38 असा विजय
-बंगळूर बुल्सची अखेरच्या क्षणी युपी योद्धाजवर 48-45 अशी मात

अहमदाबाद - विश्रांतीनंतरच्या दहाव्या मिनिटापर्यंत पकड आपली ताकद आहे असे सांगणाऱ्या हरियाना स्टीलर्सला पकडीचा एकच गुण देत यू मुम्बाने एलिमिनेटरच्या दुसऱ्या सामन्यातील अर्धी लढाई जिंकली. अर्जुन देशवाल आणि अभिषेक सिंगच्या प्रभावी आक्रमणास संयमी बचावाची साथ देत यू-मुम्बाने प्रो कबड्डीच्या सातव्या पर्वाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना हरियाना स्टिलर्सवर 46-38 असा विजय मिळवला. 
यू-मुम्बाने हरियानाचा बचाव कसा कोलमडतो याचा चांगला अभ्यास केला होता. अर्जुन आणि अभिषेकने हरियानाच्या बचावाला पूर्वार्धात हादरे दिले; तर फझल अत्राचली नसलेल्या भागात मुंबईचा बचाव कमी पडतो हे हरियानाच्या आक्रमकांनी जाणले होते, त्यामुळे बचावात सरस असलेल्या संघातील लढत आक्रमकांची कामगिरी निर्णायक ठरवत होती. त्यात अभिषेक आणि अर्जुनची पूर्वार्धात मिळून एकदाच पकड झाली होती; तर त्याच वेळी विकास कंडोला, प्रशांत कुमार राय आणि विनय या प्रमुख आक्रमकांची प्रत्येकी किमान एकदा पकड करीत मुंबईने आपली बाजू भक्कम केली होती. विकास तसेच प्रशांतने सुपर टेन कामगिरी केली; पण विकासचे चार आणि प्रशांतचे तीन चढाईतील अपयश हरियानाच्या प्रतिकारास मर्यादा घालत होते. त्याच वेळी सुरिंदर सिंग आणि संदीप नरवाल पकडीत गुण घेताना त्यांच्या अपयशी पकडीही होत्या, हेच अपयश मुंबईचे दडपण वाढवत होते. 
मुंबईचे चढाईत 32-30 असे निसटते वर्चस्व होते; पण पकडीत मुंबईने 9-5 राखलेली हुकमत आणि एका अतिरिक्त लोणच्या जोरावर मुंबईने या लढतीत आपल्या चाहत्यांचे दडपण जास्त वाढवले नाही. अभिषेकने 21 चढाईत 16 गुण मिळवले; तर अर्जुनने 18 चढाईत 15 गुण मिळवले; तर मुंबईला चढाईचे तब्बल 31 गुण देताना पाचच गुण दिले आणि हाच दोन संघांतील महत्त्वाचा फरक ठरला. हरियाना स्टीलर्सला पकडीतील अपयशावर उत्तर मिळालेच नाही आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान आटोपले. 

पवनची यूपी योद्‌ध्यांना धडक 
पवन शेरावतच्या तीन सुपर टॅकलसह एकंदर सहा-सात पकडी करीत यूपी योद्धाने बेंगळुरू बुल्सला निर्धारित वेळेत बरोबरीत रोखले खरे; पण त्याच पवनने जादा वेळेत दोन चढायांतच यूपीवर लोण चढविला आणि पहिल्या एलिमिनेटर लढतीत बेंगळुरूला 48-45 असे विजयी केले. 
पहिल्या एलिमिनेटर लढतीत रिषांक देवाडिगाने पहिल्याच चढाईत मिळविलेल्या बोनस गुणांपासून ते शेवटपर्यंत यूपी योद्‌ध्याचीच आघाडी राहिली. आठव्या मिनिटास लोण चढवत घेतलेल्या नऊ गुणांच्या आघाडीला बेंगळुरूने पूर्वार्धातच हादरे दिले. उत्तरार्धात दहाव्या मिनिटापर्यंत पिछाडी एका गुणाचीच केली; पण त्याच वेळी मोनू गोयत आणि नीतेश कुमारने एका चढाईच्या अंतराने पवनच्या दोन सुपर टॅकल करीत आघाडी थेट 31-25 वर नेली. पण, हीच आघाडी यूपीने त्यानंतर बेंगळुरूच्या चिवट प्रतिकारासह गमावली आणि निर्धारित वेळेतील अखेरच्या चढाईत बरोबरी साधली. आक्रमण आणि बचावात सरस कामगिरी करूनही यूपी योद्धाज संघाला स्वीकारावे लागलेले तीन लोण सामन्याचा निर्णय ठरविण्यास पुरेसे ठरले. 


​ ​

संबंधित बातम्या