प्रो-कबड्डी - प्ले-ऑफच्या दिशेने मुंबईचे भक्कम पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

- यु-मुंम्बा संघाने सोमवारी आव्हान संपलेल्या तमिळ थलैवाजकडून झालेला अनपेक्षित प्रतिकार 36-32 असा मोडून काढत यंदाच्या प्रो-कबड्डी मोसमातील प्ले-ऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले

- मुंबईच्या विजयात चढाईपटू अभिषेक सिंग याच्या चढाया निर्णायक ठरल्या

- अजय ठाकूरच्या गैरहजेरीत आणि राहुल चौधरीच्या उपस्थितीतही तमिळसाठी पुन्हा एकदा अजीतकुमारचा खेळ उल्लेखनीय ठरला

- आज झालेल्या पहिल्या सामन्यात गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीच्या दबंगिरीला 42-33 असा शह दिला

पंचकुला - यु-मुंम्बा संघाने सोमवारी आव्हान संपलेल्या तमिळ थलैवाजकडून झालेला अनपेक्षित प्रतिकार 36-32 असा मोडून काढत यंदाच्या प्रो-कबड्डी मोसमातील प्ले-ऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्‍चित आहे. पण, त्यासाठी पुढील काही सामन्यांची औपचारिकता बाकी राहिल. 

आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या विजयात चढाईपटू अभिषेक सिंग याच्या चढाया निर्णायक ठरल्या. त्याच्या सुपर टेन कामगिरीच्या जोरावर मुंबईचा विजय साकार झाला. त्याला कर्णधार फझल अत्राचली याची साथ मिळाली. अजय ठाकूरच्या गैरहजेरीत आणि राहुल चौधरीच्या उपस्थितीतही तमिळसाठी पुन्हा एकदा अजीतकुमारचा खेळ उल्लेखनीय ठरला. त्याच्या वेगवान चढायांनी तमिळचे आव्हान राखले होते मात्र, त्याला सहकाऱ्यांची साथच मिळाली नाही. 
राहुल चौधरी आपल्या पंधरा चढायात केवळ एकच गुण मिळवू शकला. प्रतिस्पर्धी संघांकडून बचावात फारशी चांगली कामगिरी झाली नाही. केवळ चढाईपटूंच्या कामगिरीने हा सामना लक्षात राहिला. मुंबईकडे अभिषेकच्या साथीत अतुल शिवतारे याने चमक दाखवली. पण, तमिळकडे अजितकुमार एकटाच लढला. 

दिल्लीला शह 

त्यापूर्वी, आज झालेल्या पहिल्या सामन्यात गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीच्या दबंगिरीला 42-33 असा शह दिला. मनिंदर सिंगच्या ताकदवान चढायांनी बंगालचा विजय साकार केला. बंगालने चढाईत राखलेले 28-23 वर्चस्वच निर्णायक ठरले. त्याचबरोबर दिल्ली संघाला तीन लोण स्विकारावे लागले. याचा त्यांच्या खेळावर चांगलाच परिणाम झाला. मनिंदरचे 13, सुकेश हेगडेते 7 आणि नबीबक्षचे पाच गुण हे बंगालचे चढाईचे वर्चस्व सिद्ध करणारे होते. दिल्लीकडून नविन कुमारची सुपर टेन कामगिरी झाली, पण ती त्यांना विजय मिळवून देऊ शकली नाही. दिल्लीचा आतापर्यंतच्या 20 सामन्यातील हा तिसराच पराभव ठरला.


​ ​

संबंधित बातम्या