आमच्या सूचना कर्णधाराने ऐकल्याच नाहीत

संजय घारपुरे
Thursday, 17 October 2019

- यू मुम्बाला प्रो कबड्डीच्या उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाच्या मार्गदर्शकांनी कर्णधार फझल अत्राचलीस या पराभवासाठी जबाबदार धरले.

- अजिंक्‍यने एकाच चढाईत चार गुण घेत मुंबईचे आव्हान निर्माण केले, पण त्यानंतर त्याला चढाईसच पाठवण्यात आले नाही आणि मुंबईला बंगालविरुद्ध दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला

अहमदाबाद - यू मुम्बाला प्रो कबड्डीच्या उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाच्या मार्गदर्शकांनी कर्णधार फझल अत्राचलीस या पराभवासाठी जबाबदार धरले. एका चढाईत चार गुण मिळवल्यानंतर फझलने अजिंक्‍यला त्यानंतर चढाईसाठी पाठवले नाही, तसेच त्याच्या सदोष बचावात्मक खेळाचा मुंबईला फटका बसल्याचे मुंबई संघाचे सहायक मार्गदर्शक उपेंद्र कुमार यांनी सांगितले. 
मुंबई सामन्यातील दहा मिनिटे असताना दहा गुणांनी मागे होते. त्याच सुमारास अजिंक्‍यने एकाच चढाईत चार गुण घेत मुंबईचे आव्हान निर्माण केले, पण त्यानंतर त्याला चढाईसच पाठवण्यात आले नाही आणि मुंबईला बंगालविरुद्ध दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. यास मुंबईचे सहायक मार्गदर्शक उपेंद्र कुमारही सहमत होते. ""आम्हा दोन्ही मार्गदर्शकांचे हेच मत होते. टाइम आउटच्या वेळी हेच सांगितले होते. आमचे प्रमुख मार्गदर्शक संजीव यांनी त्याला अजिंक्‍य चढाई तर करणार नाही हे दडपण त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. त्यालाच पाठव. त्याने मुंबईला सामन्यात परत आणले होते. त्याने बंगाल संघावर दडपण आणले होते. त्याने परत चढाई केली असती, तर सामन्याचा निकालच स्पष्ट झाला होता. त्याला चढाईला न पाठवण्याची नक्कीच चूक झाली. कोणाला चढाईस पाठवायचे हा निर्णय मैदानातून घेतला जातो. आता हा निर्णय कर्णधाराने घेतला. त्याला अजिंक्‍य नवोदित आहे. तो जास्त सामने खेळलेला नाही. त्यामुळे कर्णधारास अर्जुन गुण मिळवून देऊ शकतो, असे वाटले असेल; अर्जुन देशवालने यापूर्वीच्या चढाईतही चूक केली होती. हे उपेंद्र यांनी मान्य केले. आपण बोनस घेतला असे त्याला वाटले होते, पण तो त्याला मिळाला नव्हता. ती चढाईही एक प्रकारे निर्णायक ठरली होती. आज त्याच्याकडून नेहमीसारखा खेळ होत नाही, हे सामन्याच्या सुरुवातीपासून दिसत होते. तेच अखेरच्या मिनिटातही घडत होते, त्यामुळेच तर आम्ही मार्गदर्शक अजिंक्‍यला चढाईला पाठव, त्याचे दडपण प्रतिस्पर्ध्यांवर असल्याचे सांगत होतो. आता कर्णधारास आम्ही सतत कसे सांगणार, सतत तर टाइम आउट घेता येत नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आक्रमकांच्या अपयशाने आव्हान जास्त खडतर झाल्याचे सांगितले. अभिषेकला त्यातच अर्जुनची पूर्ण साथ लाभली नाही. 
--------- 
सामन्याच्या सुरुवातीस बचावपटूंनी चुका केल्या. नको त्या वेळी फझलने पकड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकदा दोन गुण गेले, तर एकदा चार. बंगालचे संपूर्ण लक्ष फझलकडे होते. तो पकडीसाठी पुढे येईल आणि आपल्याला गुण मिळतील आणि त्याच चुका फझल करीत होता. त्याचा फटका बसला. 
- उपेंद्र कुमार, मुंबईचे सहायक मार्गदर्शक 
---- 
संघाची गरज असताना चार गुण मिळविले. मी नवा असल्याने कर्णधार लगेच विश्‍वास दाखवेल असे वाटले नव्हते. त्यांनी संधी दिली तेव्हा गुण मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. 
- अजिंक्‍य कापरे 


​ ​

संबंधित बातम्या