गुजरात संघाला हरवून यु मुम्बा चौथ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

-यु मुम्बाने आक्रमणाची साथ दिली आणि त्याच जोरावर प्रो-कबड्डी स्पर्धेत गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सला 31-25 असे हरविले

-या विज.याने गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर येत प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा भक्कम केल्या

- दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्सला बंगाल वॉरियर्सकडून अगदी अखेरच्या क्षणाला 40-41 असा एका गुणाने पराभव पत्करावा लागला.

जयपूर - भक्कम बचावाला यु मुम्बाने आक्रमणाची साथ दिली आणि त्याच जोरावर प्रो-कबड्डी स्पर्धेत गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सला 31-25 असे हरविले आणि अव्वल चार संघांत प्रवेश केला. 
अभिषेक सिंगने सुपर टेन (11 गुण) करीत मुंबईचा विजय साकारला. त्याला सुरिंदर सिंग आणि हरेंदर कुमारच्या पकडींची साथ लाभली आणि मुंबईचा विजय स्पष्ट झाला. या विजयामुळे गुणतक्‍त्यात चौथे आलेल्या मुंबईस प्लेऑफची आशा आहे. 
गुजरात तसेच मुंबईचा बचाव चांगला आहे, त्याच वेळी प्रतिस्पर्धी संघात नावाजलेला आक्रमक नाही. त्यामुळे चुरशीची लढत होईल, ही अपेक्षा होती. सामन्यात सुरवातीस बचावाचेच वर्चस्व होते. पण, अभिषेक सिंगच्या चढाया यशस्वी होण्यास सुरवात झाल्यावर मुंबईचे वर्चस्व दिसू लागले. पहिल्या डावातील आठ मिनिटे असताना मुंबईने लोण दिला. पण, रोहित गुलियाच्या प्रतिआक्रमणामुळे गुजरातने विश्रांतीस बरोबरी साधली. 
दुसऱ्या डावाच्या सुरवातीस गुजरातच्या सुनील कुमारला दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांच्या बचावाची घडी विसकटली. अर्जुन देशवालच्या अनुपस्थितीत अभिषेक चढाईची बाजू चांगल्या प्रकारे सांभाळत होता. तीन मिनिटे असताना मुंबईने लोण दिला आणि मुंबईच्या भक्कम बचावपटूंनी ही आघाडी राखली. 

बंगालची सरशी 
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्सला बंगाल वॉरियर्सकडून अगदी अखेरच्या क्षणाला 40-41 असा एका गुणाने पराभव पत्करावा लागला. जयपूरकडून नीलेश साळुंके (15) आणि दीपक हुडा (10) यांना सुपर टेन कामगिरी करूनही बचावातील ढिलाईमुळे पराभव पत्करावा लागला. बंगालकडून मनिंदरने 19 गुणांची कमाई करताना बलदेव सिंग आणि रिंकू नरवाल या बचावपटूंच्या कामगिरीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


​ ​

संबंधित बातम्या