कोपा अमेरिका फुटबॉल : 'वार'च्या कृपेमुळे उरुग्वेची जपानविरुद्ध बरोबरी 

वृत्तसंस्था
Friday, 21 June 2019

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी सुआरेझ याने पेनल्टी किकवर केलेला गोल वादग्रस्त होता. जपानने पूर्वार्धात आघाडी घेतल्यानंतर चारच मिनिटात उरुग्वेला "वार'च्या (व्हिडीओ सहाय्यक रेफरी) मदतीने पेनल्टी किक देण्यात आली. गोलक्षेत्रात उरुग्वे आक्रमकाने प्रवेश केला होता.

रिओ दे जेनेरिओ : कोजी मायोशी याच्या दोन गोलमुळे जपानने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य उरुग्वेला 2-2 असे बरोबरीत रोखले. खरे तर "वार'ने उरुग्वेची हार टाळली, असे म्हणणे योग्य होईल. 

लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी सुआरेझ याने पेनल्टी किकवर केलेला गोल वादग्रस्त होता. जपानने पूर्वार्धात आघाडी घेतल्यानंतर चारच मिनिटात उरुग्वेला "वार'च्या (व्हिडीओ सहाय्यक रेफरी) मदतीने पेनल्टी किक देण्यात आली. गोलक्षेत्रात उरुग्वे आक्रमकाने प्रवेश केला होता. त्या वेळी चेंडूवर ताबा घेण्यासाठी एडिसन कॅवानी आणि उएदा यांनी गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्या वेळी उएदाकडून कोणतीही चूक घडल्याचे टीव्ही रिप्लेत दिसले नव्हते, तरीही "वार'ने उएदाकडून फाऊल झाल्याचा निर्णय दिला. सुआरेझने प्राप्त पेनल्टी किक सत्कारणी लावली. 

"क' गटातील ही लढत बरोबरीत सुटल्यामुळे जपानच्या बाद फेरीच्या आशा धूसर आहेत. त्यांची इक्वेडोरविरुद्धची लढत शिल्लक आहे. सलामीला चिलीविरुद्ध 0-4 हार पत्करलेला जपान उरुग्वेला किती आव्हान देईल हा प्रश्नच होता. प्रत्यक्षात त्यांनी आघाडी घेऊन उरुग्वेवर दडपण आणले होते. जपानची आक्रमक फळी बहरात आली होती. एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझ या उरुग्वेच्या स्टार आक्रमकांना रोखण्यातही जपान चांगलेच यशस्वी ठरले होते. जपानच्या योजनाबद्ध खेळासमोर उरुग्वेचा कमकुवत बचाव कोलमडत असतानाच त्यांना "वार'चा टेकू लाभला आणि त्यावर ते तरले.


​ ​

संबंधित बातम्या