पराभवाने विदर्भाच्या अभियानाची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 April 2019

सिमरन बहादूरची अष्टपैलू कामगिरी व सलामीवीर प्रिया पुनियाच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने शेवटच्या साखळी सामन्यात यजमान विदर्भाचा पाच गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या बादफेरीत स्थान पटकाविले.

नागपूर : सिमरन बहादूरची अष्टपैलू कामगिरी व सलामीवीर प्रिया पुनियाच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने शेवटच्या साखळी सामन्यात यजमान विदर्भाचा पाच गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या बादफेरीत स्थान पटकाविले. विदर्भाची कर्णधार दिशा कासटची अर्धशतकी खेळीही विदर्भाला मिळवून देऊ शकली नाही. 
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर विदर्भाने विजयासाठी दिलेले 151 धावांचे लक्ष्य दिल्लीने 48.3 षट्‌कांत पाच गडी गमावून सहज पार केले. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सिमरनने सात चौकारांसह 78 चेंडूंत सर्वाधिक 50 धावा काढल्या. सलामीवीर पुनियाने पाच चौकारांच्या मदतीने 84 चेंडूंत 41 धावांचे योगदान दिले. दोघींनी तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 66 धावा जोडून विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने 50 षट्‌कांत 8 बाद 150 अशी धावसंख्या उभारली. कर्णधार दिशाचा अपवाद वगळता विदर्भाची एकही फलंदाज मोठी खेळी करू शकली नाही. दिशाने नऊ चौकार व एका षट्‌कारासह 141 चेंडूंत 87 धावा फटकावल्या. दिल्लीचा आठ सामन्यातील हा सहावा विजय होय. विदर्भाच्या मुली साखळी फेरीतील आठपैकी केवळ दोनच सामने जिंकू शकल्या. सहा लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 

संक्षिप्त धावफलक 
विदर्भ : 50 षट्‌कांत 8 बाद 150 (दिशा कासट 87, लतिका इनामदार 10, सलोनी अलोट 10, सिमरन बहादूर 2-49, रिया शर्मा 2-36, नेहा छिल्लर 1-12, मधू 1-17, सोनिया लोहिया 1-27, आयुषी सोनी 1-9). दिल्ली : 48.3 षट्‌कांत 5 बाद 152 (सिमरन बहादूर 50, प्रिया पुनिया 41, आयुषी सलोनी 18, लक्ष्मी यादव 13, आरुषी गोयल नाबाद 12, वैष्णवी खंडकर 2-32, मिनाक्षी बोडखे 1-24, नुपूर कोहळे 1-32). 

मुंबईसह पाच संघ बादफेरीत 
साखळी फेरीतील कामगिरीच्या आधारावर एलिट "अ' व "ब' गटातून बंगाल, हिमाचल प्रदेश, मुंबई, दिल्ली आणि कर्नाटक हे पाच संघ बादफेरीसाठी पात्र ठरले आहेत. बंगाल व हिमाचलने आठपैकी आठही सामने जिंकले, तर मुंबई, दिल्ली व कर्नाटकने प्रत्येकी सहा सामन्यांमध्ये विजय नोंदविला. बादफेरीचे सामने नागपुरात खेळले जाणार आहेत. महाराष्ट्राला 20 गुणांसह ब गटात चौथे तर एकूण सातवे स्थान मिळाले. त्यामुळे त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळू शकला नाही.

​ ​

संबंधित बातम्या