यासर डोगू इंटरनॅशनल : विनेश फोगट, राहुल आवारेची सुवर्ण पदकाला गवसणी

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

पुरुष गटात महाराष्ट्राच्या राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याने तुर्कीच्या मुनीर अक्तासला 4-1 ने आस्मान दाखवले.

इस्तांबूल : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने यासर डोगू इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने रशियाची खेळाडू एक्टेरिना पोलेशचुकला 9-5 गुणांच्या फरकाने धूळ चारली. 53 किलो वजनी गटात खेळताना विनेशने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 

सीमा (50 किलो) आणि मंजू (59 किलो) यांच्यानंतर विनेश सुवर्णपदक जिंकणारी तिसरी महिला कुस्तीपटू ठरली आहे. माद्रिदमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दिव्या कक्रान (68 किलो) आणि रौप्यपदक विजेती पूजा ढंद (57 किलो) यांनी निराशा केली. दिव्या पात्रता फेरीत, तर पूजा उपांत्य फेरीत पराभूत झाली. दुखापतग्रस्त झालेल्या साक्षी मलिकला पदक फेरी गाठता आली नाही. 

पुरुष गटात महाराष्ट्राच्या राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याने तुर्कीच्या मुनीर अक्तासला 4-1 ने आस्मान दाखवले. राहुलचे हे पहिले करिअर रँकिंग सीरिज सुवर्णपदक ठरले आहे. याच प्रकारात महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने कांस्यपदक पटकावले आहे. 

बजरंग पुनियाऐवजी भारतीय संघात स्थान मिळालेल्या मराठमोळ्या सोनबा तानाजी गोंगाणेला (६५ किलो) कांस्यपदकाच्या लढाईत तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.


​ ​

संबंधित बातम्या