पाठीराख्यांच्या अभूतपूर्व उत्साहाला न्याय देऊ शकलो नाही ः छेत्री

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

- सॉल्ट लेग स्टेडियमवर पाठीराख्यांचा जेवढा उदंड पाठिंबा होता, तेवढा चमकदार खेळ आम्हाला करता आला नाही, अशी भावना व्यक्त करून भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने निराशा व्यक्त केली

- हा आमचा सर्वांत सुमार खेळ होता, अशी निराशा छेत्रीने सामन्यानंतर व्यक्त केली. स्टेडियममध्ये जे उत्स्फूर्त वातावरण होते, तेवढा चांगला खेळ आम्हाला करता आला नाही

कोलकता - सॉल्ट लेग स्टेडियमवर पाठीराख्यांचा जेवढा उदंड पाठिंबा होता, तेवढा चमकदार खेळ आम्हाला करता आला नाही, अशी भावना व्यक्त करून भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने निराशा व्यक्त केली. जो सामना सहज जिंकायला हवा होता, त्या बांगलादेशविरुद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल सामन्यात भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. 
पाठीराख्यांची विक्रमी उपस्थिती असलेल्या या सामन्यात आदिल खानने अखेरच्या मिनिटांत हेडर केला; त्यामुळे भारताला बरोबरी साधता आली. या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी भारताने वाया घालवल्या. त्याचबरोबर बांगलादेशला काही काळ सामन्यावर पकड मिळवण्यास मदत केली. 
हा आमचा सर्वांत सुमार खेळ होता, अशी निराशा छेत्रीने सामन्यानंतर व्यक्त केली. स्टेडियममध्ये जे उत्स्फूर्त वातावरण होते, तेवढा चांगला खेळ आम्हाला करता आला नाही. याबाबत ड्रेसिंग रूम फारच व्यथित झाले होते, असे छेत्री म्हणाला. 
आक्रमणात आम्ही अनेक संधी दवडल्या; परंतु बचावात चांगला खेळ केला, असे सांगताना छेत्रीने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या पाठीराख्यांचे आभार मानले. अशाच संख्येने तुम्ही मैदानात येत राहा, असे आवाहनही त्याने केले. 
आशिया विजेत्या कतारला अगोदरच्या सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे भारताचे पारडे या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वरचढ होते; परंतु निकाल मात्र तसा लागला नाही. बांगलादेशकडून सादुद्दीनने 42 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर बरोबरीचा गोल करण्यासाठी भारताला शर्थ करावी लागली. अखेर 88 व्या मिनिटाला आदिलने गोल करून पराभव टाळला. हा बरोबरीचा गोल झाला नसता तर भारताच्या पुढच्या फेरीतील प्रवेशात मोठा अडथळा ठरला असता. भारताचे आता तीन सामन्यांतून दोन गुण झाले आहेत; तर बांगलादेश तीन सामन्यांतून एकच गुण मिळवून गटात तळाच्या स्थानी आहे.  


​ ​

संबंधित बातम्या