आयपीएल कधी होणार ? काय म्हणाले क्रिडा मंत्री वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

कोरोना व्हायरसमुळे काही मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलही पुढे ढकलण्यात आले आहे. पण आता आयपीएल होणार की नाही ? यावर भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी एक मोठे विधान केले आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिल पर्यत पुढे ढकलली आहे. परंतु याच दिवशी भारत सरकार कडून या कोरोना व्हायरसच्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्व होणार आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा होणार की नाही असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे. 

बीसीसीआयला आयपीएल खेळवायची असेल तर त्यांना आता भारताच्या क्रीडा मंत्रालयाची परवानगी लागेल. क्रीडा मंत्रालयाच्या परवानगीशिवाय त्यांना भारतात आयपीएल खेळवता येणार नाही. क्रीडा मंत्र्यांनी जर परवानगी दिली नाही तर बीसीसीआयला आयपीएल भारतात भरवता येणार नाहीत.

 " भारत सरकार १५ एप्रिलला कोरोना व्हायरसबाबत काही मार्गदर्शक तत्व जाहीर करणार आहे. त्यानुसार सर्वांना काम करावे लागणार आहे. जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, हे सर्वांचेच म्हणणे आहे. पण ही मार्गदर्शक तत्व जाहीर झाल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल."
असं वक्तव्य क्रिडा मंत्री यांनी केले. 

 पुढे ते म्हणाले, "बीसीसीआय ही फक्त क्रिकेट हा खेळ पाहते, इतर खेळ नाही. सध्या ऑलिम्पिकचा मुद्दाही महत्वाचा आहे, जे बीसीसीआय पाहत नाही. आम्हाला सर्वच खेळ पाहावे लागतात. हा मुद्दा नागरिकांच्या सुरक्षेबाबत आहे. एका सामन्याला हजारो प्रेक्षक येत असतात. त्यामुळे हा प्रश्न आता फक्त खेळाचा उरलेला नाही तर हा मुद्दा आता देशाचा झालेला आहे." असं त्यांनी म्हटले आहे. 

 ११ मार्चपासून विदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएल सुरु झाली तरी विदेशी खेळाडूंचे काय करायचे ? हा प्रश्न बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीपुढे नक्कीच असेल. आता आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पण त्यावेळी तरी विदेशी क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार का ?  हा प्रश्न बीसीसीआयसाठी महत्वाचा असेल.


​ ​

संबंधित बातम्या