जागतिक मैदानी स्पर्धा ः बोल्टचा वारसदार कोण ?

नरेश शेळके
Saturday, 21 September 2019

हिंदी चित्रपटसृष्टीतील 1950 ते आतापर्यंतचा काळ सुपरस्टारच्या दृष्टीने विचारात घेतला, तर दिलीपकुमार, राज कपूर, देवानंद, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, धमेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, 

हिंदी चित्रपटसृष्टीतील 1950 ते आतापर्यंतचा काळ सुपरस्टारच्या दृष्टीने विचारात घेतला, तर दिलीपकुमार, राज कपूर, देवानंद, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, धमेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, 
ते आतापर्यंतच्या रणवीर सिंगपर्यंत यादी येऊन थांबते. आता ही तुलना जागतिक ऍथलेटिक्‍समध्ये पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत 1970च्या दशकापासून करायची झाल्यास जिम हाइन्स, डॉन क्वॅरी, कार्ल लुईस, बेन जॉन्सन, डोनाव्हन बेली, लिनफोर्ड ख्रिस्ती, मॉरिस ग्रीन, ऍटो बोल्डन, किम कॉलिन्स, टायसन गे, असाफा पावेल, जस्टीन गॅटलीन, योहान ब्लेक अशा सुपरस्टार धावपटूंपर्यंत पोचते. मात्र, जमैकातील उसेन बोल्ट नावाच्या ताऱ्याचा ऍथलेटिक्‍स क्षितिजावर उदय झाला आणि त्यानंतर शंभर मीटर शर्यतीत बोल्ट सोडून कुणी सुपरस्टारच झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याची ट्रॅकवरून बिदाई झाली आणि त्यामुळे शंभर मीटर शर्यतीतील पुढील सुपरस्टार कोण, हा प्रश्‍न पुढे आला. योहान ब्लेक आणि जस्टीन गॅटलीन हे दिग्गज टिकून असले तरी नवीन सितारा कोण, हा प्रश्‍न कायम आहे. कॅनडाच्या आंद्रे दी ग्रासीने चार वर्षांपूर्वी चमक दाखविल्याने त्याच्याकडे बोल्टचा वारसदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, तो अल्पावधित पडद्यामागे गेला. त्यामुळे पुन्हा एकदा जगाच्या नजरा अमेरिकेन धावपटूंवर खिळल्या आहेत. त्यातही ख्रिस्तीयन कोलमन आघाडीवर आहे. कोलमनचा प्रवेश "वाडा'च्या नियमामुळे थोडा वादात अडकला होता. मात्र, त्याच्याविरुद्धचे आरोप मागे घेण्यात आल्याने तो दोहाच्या विमानात बसणार, हे पक्के झाले. रौप्यपदक जिंकून कोलमनने आपली चुणूक दोन वर्षांपूर्वीच दाखविण्यास सुरवात केली. दोहात कोलमनचे पारडे जड असले तरीही यंदा बोलबाला असलेला खेळाडू कुणी नाही. विद्यमान विजेता जस्टीन गॅटलीन, त्याचा सहकारी माईक रॉजर्स याशिवाय नायजेरियाचा डिव्हाईन ओडुडुरू, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रकुल विजेता अकानी सिम्बिने, जमैकाचा माजी विश्‍वविजेता योहान ब्लेक, आयव्हरी कोस्टचा आर्थर सिस, ग्रेटब्रिटनचा झार्नेल ह्युजेस हे प्रमुख धावपटू कोलमनचे आव्हानवीर ठरू शकतात. चित्रपट कितीही बिग बजेट असला आणि त्यात सुपरस्टारची भरमार असली तरी अपेक्षा असलेला एखादा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आपटतो. तसेच शंभर मीटरचे आहे, कुणी कितीही सुपरस्टार असला तरी तोसुद्धा पराभूत होऊ शकतो; कारण दहा सेकंदांच्या आत संपणाऱ्या या शर्यतीत अंतिम क्षणी जो बाजी मारतो तोच सुपरस्टार ठरतो. 

शंभर मीटर (पुरुष) 

विश्‍वविक्रम ः 9.58 सेकंद (उसेन बोल्ट- 2009) 
स्पर्धा विक्रम ः 9.58 - उसेन बोल्ट (जमैका- 2009) 
यंदाची सर्वोत्तम वेळ ः 9.81 सेकंद - ख्रिस्तीयन कोलमन (अमेरिका) 
सुवर्णपदके ः अमेरिका (9), जमैका (4), ग्रेट ब्रिटन, कॅनडा, सेंट किट्‌स (प्रत्येकी 1). 
प्राथमिक फेरी ः रात्री 8.35 (27 सप्टेंबर), रात्री 9.15 (उपांत्य, 28 सप्टें.), पहाटे 12.45 (अंतिम- 29 सप्टें.). 


​ ​

संबंधित बातम्या