कबड्डीच्या ऑलिंपिक प्रवेशासाठी आग्रह धरणार

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

- केंद्र सरकारच्या वतीने 2024 ऑलिंपिकमध्ये कबड्डीच्या समावेशासाठी आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी येथे दिले

- भारतीय खेळ किती यशस्वी होऊ शकतो, याचे कबड्डी हे उत्तम उदाहरण म्हणता येईल

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने 2024 ऑलिंपिकमध्ये कबड्डीच्या समावेशासाठी आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी येथे दिले. 
एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना रिजिजू म्हणाले,""एक क्रीडामंत्री म्हणून भारतीय खेळांबाबत मी कमालीचा उत्सुक राहिलो आहे. भारतीय खेळांच्या प्रोत्साहनासाठीदेखील एक पाऊल पुढे राहिलो आहे. भारतीय खेळ किती यशस्वी होऊ शकतो, याचे कबड्डी हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.'' 
रिजिजू यांनी या वेळी बोलताना कबड्डीच्या ऑलिंपिक समावेशविषयी आपल्याला खात्री असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ""भारतात ज्या क्रीडा संस्कृतीची गरज होती, ती आता रुजायला सुरवात झाली आहे. कबड्डीच्या लोकप्रियतेतून हेच दिसून येते. त्याचमुळे पुढील ऑलिंपिक स्पर्धेत कबड्डीचा समावेश व्हावा, यासाठी आम्ही आग्रही असू. आपली ताकद मोठी आहे आणि आपला आग्रह कुणाला डावलता येणार नाही. आम्ही एकत्रित प्रयत्न करून कबड्डीचा समावेश ऑलिंपिकमध्ये करायलाच लावू आणि हे स्वप्न साकार होईल याची मला खात्री आहे.'' 
कबड्डीची मजल ही आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत केली आहे. अगदी अलीकडच्या म्हणजे 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने भारताची सुवर्णपदकाची मक्तेदारी मोडून काढत सुवर्णपदकाची कमाई केली होती. यामध्ये भारतीय पुरुष संघाला ब्रॉंझ, तर महिलांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. 
-------
क्रीडामंत्र्यांची स्वप्नपूर्ती अवघडच 
पाच वर्षांत कबड्डीला ऑलिंपिकमध्ये कसे नेणार हे सांगणे क्रीडामंत्र्यांनी टाळले, पण एखाद्या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते. तसेच त्यासाठी कमालीचे लॉबिंग आवश्‍यक असते. एकंदरीत प्रक्रिया लक्षात घेतल्यास 2024 च्या ऑलिंपिकमधील कबड्डीचा समावेश हे दिवास्वप्नच ठरू शकते. 
ही असते प्रक्रिया 
- खेळास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता हवी (कबड्डीस अद्याप नाही) 
- खेळाच्या आंतरराष्ट्रीय महासंघास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची संलग्नता (याची प्रक्रियाही सुरू नाही) 
- आपल्या खेळास ऑलिंपिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान, त्यासाठीची निकषपूर्ती आवश्‍यक 
- 2024 च्या ऑलिंपिकमध्ये कोणत्याही अतिरिक्त खेळाचा समावेश यापुढे न करण्याचा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा 25 जून रोजी निर्णय 
- 2024 चे ऑलिंपिक पॅरिसला. ब्रेकिंग, स्पोर्ट क्‍लायबिंग, स्केटबोर्डिंग आणि सर्फिंगचा समावेश करण्याची यजमानांची विनंती. याबाबतचा निर्णय 2020 च्या डिसेंबरमध्ये. 


​ ​

संबंधित बातम्या