कुमार राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स - अभिषेक उभेचा राष्ट्रीय विक्रम अमान्य

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

- पुण्याचा आंतरराष्ट्रीय धावपटू अभिषेक उभेने गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या 35 व्या ज्युनिअर राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 20 वर्षे मुलांच्या 110 मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

- मात्र, वाऱ्याचा वेग निर्धारीत वेगापेक्षा अधिक असल्याने त्याचा राष्ट्रीय विक्रम अमान्य करण्यात आला आहे.

नागपूर -  पुण्याचा आंतरराष्ट्रीय धावपटू अभिषेक उभेने गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या 35 व्या ज्युनिअर राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 20 वर्षे मुलांच्या 110 मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र, वाऱ्याचा वेग निर्धारीत वेगापेक्षा अधिक असल्याने त्याचा राष्ट्रीय विक्रम अमान्य करण्यात आला आहे. 18 वर्षे गटात महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने स्पर्धा विक्रमाची नोंद करीत सुवर्ण जिंकले. 
अभिषेकने 13.84 सेकंदात शर्यत पूर्ण करून 2010 मध्ये बंगळूर येथे सुरींदरने केलेला 13.92 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम इतिहास जमा केला होता. तशीही घोषणाही करण्यात आली होती. मात्र, नंतर पंचांनी वाऱ्याचा वेग तपासला असता तो 2.1 मीटर प्रती सेकंद असल्याचे लक्षात आल्याने निकाल सुधारीत करण्यात आला आणि अभिषेकचा राष्ट्रीय विक्रम रद्द करण्यात आला. नियमाप्रमाणे वाऱ्याचा वेग 2 मीटर प्रती सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्‍यक असते. 
स्पर्धेत 18 वर्षे मुलांच्या 110 हर्डल्समध्येही महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. यात तेजस शिरसेने 13.59 सेकंदाच्या स्पर्धा विक्रमाची नोंद करताना 13.57 सेकंद असा नवीन विक्रम केला. 20 वर्षे मुलींच्या 100 मीटर हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राच्या रिशिका नेपालीला ब्रॉंझपदकावर (14.89 सेकंद) समाधान मानावे लागले. 
धुळे जिल्ह्यातील नंदुरबार येथे विपरीत परिस्थितीत उंच उडीचा सराव करणाऱ्या अभय गुरवने 20 वर्षे मुलांच्या उंच उडीत ब्रॉंझपदक जिंकले. त्याने 2.04 उडी मारली. मुलींच्या 20 वर्षे वयोगटात हतोडाफेकीत स्नेहा जाधव रौप्यपदकाची मानकरी ठरली. तिने 49.98 मीटर अंतरावर हातोडा फेकला. याच वयोगटात मुलींच्या तीन हजार मीटर शर्यतीत नाशिककर पूनम सोनुनेची ब्रॉंझपदकावर घसरण झाली. पाच हजार मीटर शर्यतीतही तिला ब्रॉंझ मिळाले होते. गेल्यावर्षी रांची येथे झालेल्या स्पर्धेत तिने दोन्ही शर्यतीत सुवर्ण जिंकले होते. यात दिल्लीच्या चंदाने 9 मिनिटे 42.71 सेकंदाची वेळ स्पर्धा विक्रमाची नोंद केली. 
मिडले शर्यतीत महाराष्ट्राच्या 16 वर्षे मुलींच्या संघाने सुवर्ण, 16 आणि 18 वर्षे मुलांनी रौप्यपदक जिंकले. 20 वर्षे मुलांच्या पोल व्हॉल्टमध्ये महाराष्ट्राच्या राकेश गोंडला रौप्यपदक मिळाले. त्याने 4.90 मीटर अंतर पार केले. 
---- 

अभिषेकचे दुहेरी दुर्दैव 
अभिषेक उभे याने कुमार राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत आधी राष्ट्रीय विक्रम केला. मात्र, वाऱ्याच्या वेगाने त्याला या विक्रमापासून दूर ठेवले. यानंतरही तो सरस वेळ देत पुढील वर्षी 7 ते 12 जुलै दरम्यान नैरोबी येथे होणाऱ्या कुमार जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र देखील ठरला. त्याने त्यासाठी 14.15 सेकंद ही पात्रता वेळही पार केली. मात्र, या स्पर्धेपूर्वी दोन महिने आधीच तो वयाची 20 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे तो जागतिक स्पर्धेतही सहभागी होऊ शकणार नाही. 


​ ​

संबंधित बातम्या