जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासमोर कठिण आव्हान

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

-  भारताची जखमी खेळाडू दीपा कर्माकर हिच्या गैरहजेरीत उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासमोर कठिण आव्हान राहणार आहे

- दीपाच्या गैरहजेरीत महिला विभागात भारताचे प्रतिनिधित्व प्रणती नायक, प्रणती दास, अरुणा बुड्डा रेड्डी करणार आहेत.

- पुरुष विभागात 2010 मधील आशियाई स्पर्धेचा ब्रॉंझपदक विजेता आशिष कुमार याच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच्यासह योगेश्‍वर सिंग आणि आदित्य राणा या दोघांना संघात समावेश आहे

स्टुटगार्ट (जर्मनी) - भारताची जखमी खेळाडू दीपा कर्माकर हिच्या गैरहजेरीत उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतासमोर कठिण आव्हान राहणार आहे. 
या स्पर्धेतून भारताला पदकाची अपेक्षा नसली, तरी किमान कामगिरीचा स्तर उंचावण्याकडे त्यांचा कल राहील. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा त्यानंतर मात्र दुखापतींचाच सामना करत आहे. टाचेच्या दुखापतीमधून अजून ती पूर्ण बरी झालेली नाही. त्यामुळे ती स्पर्धेत खेळू शकणार नाही. 
दीपाच्या गैरहजेरीत महिला विभागात भारताचे प्रतिनिधित्व प्रणती नायक, प्रणती दास, अरुणा बुड्डा रेड्डी करणार आहेत. यामधील प्रणती नायक हिने यावर्षी मंगोलियात वरिष्ठ आशियाई स्पर्धेत वॉल्ट प्रकारात ब्रॉंझपदक मिळविले आहे, तर अरुणा 2018 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती आहे. अर्थात, ही जागतिक स्पर्धा असल्यामुळे भारतीय खेळाडूंनी अधिक तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. 
पुरुष विभागात 2010 मधील आशियाई स्पर्धेचा ब्रॉंझपदक विजेता आशिष कुमार याच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच्यासह योगेश्‍वर सिंग आणि आदित्य राणा या दोघांना संघात समावेश आहे. 
या स्पर्धेतून प्रत्येक गटातील अव्वल नऊ संघ ऑलिंपिकसाठी पाठ ठरणार आहेत. यात 2018 मध्ये यापूर्वी पात्र ठरलेल्या तीन गटांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर वैयक्तिक प्रकारात एकूण 12 पुरुष आणि 20 महिला खेळाडू टोकियोसाठी पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर पात्र ठरलेल्या संघांखेरीज प्रत्येक वैयक्तिक प्रकारातील पहिले तीन खेळाडू देखील ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत. 
------ 

आशिष, प्रणती नायक, अरुणा यांनी यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. या वेळी त्यांच्याकडून किमान अंतिम फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. ऑलिंपिक प्रवेश मिळविल्यास या खेळाडूंना सरावासाठी 20 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकेल. 
- रियाज भाटी, भारतीय संघ प्रमुख 
 


​ ​

संबंधित बातम्या