जागतिक बॅडमिंटन: सिंधूची हुकूमत, श्रीकांतचा संघर्ष 

वृत्तसंस्था
Wednesday, 1 August 2018

पहिला गेम जिंकल्यावर चुका झाल्या. या चुका तिसऱ्या गेमच्या सुरुवातीसही झाल्या. नेमके काय चुकत होते तेच कळत नव्हते. त्यावेळी मी खूप काही करून बघितले होते. पराजित होता होता वाचलो आहे. आता मार्गदर्शकांबरोबर चर्चा केल्याशिवाय स्वस्थता लाभणार नाही. 
- किदांबी श्रीकांत

नान्जिंग / मुंबई : पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय यशोमालिका कायम ठेवली. किदांबी श्रीकांतला विजयासाठी संघर्ष करावा लागला असला, तरी सिंधूने सहज विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. साई प्रणीतचा विजय समाधान देणारा असला तरी, एच. एस. प्रणॉयच्या पराभवाचा धक्का भारताला बसला. समीर वर्माही पराभूत झाला. 

सिंधूने आगामी लढतींची चांगली तयारी करताना फित्रियानीचा 21-14, 21-9 असा 35 मिनिटांतच पराभव केला. पारडे सतत बदलणाऱ्या लढतीत श्रीकांतने स्पेनच्या पाब्लो अबियन याला तीन गेमच्या लढतीत 21-15, 12-21, 21-14 असे हरवले. साई प्रणीतने लुईस एन्‍रिक पेनाल्वेर याला 21-18, 21-11 असे हरवले. दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी, सात्विक साईराज - चिराग शेट्टी (पुरुष) आणि अश्‍विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी (महिला) यांचे आव्हान संपले. 

समीर वर्माने लीन दान, तसेच त्याच्या चाहत्यांना चांगली लढत दिली, पण पाऊण तासाच्या लढतीत तो अखेर 17-21, 14-21 असा पराजित झाला. मात्र यापेक्षाही प्रणॉयची हार धक्कादायक होती. अकरावा मानांकित प्रणॉय ब्राझीलच्या इगॉर कोएल्होविरुद्ध पराजित झाला. त्याने पहिला गेम 21-8 असा सहज जिंकला, पण त्यानंतरचे दोन गेम 16-21, 15-21 असे गमावत 55 मिनिटे चाललेल्या लढतीत हार पत्करली. 

सिंधूने सुरवातीस प्रतिस्पर्धीस जाणून घेतले, त्यावेळी आघाडी तसेच सर्व्हिस वेगाने बदलली, पण काही वेळातच 6-4 आघाडीवरून 11-6 झेप घेतली. त्यावेळी प्रतिस्पर्धीस चुका करण्यास भाग पाडले होते. आगामी लढती लक्षात घेऊन सिंधूने दीर्घ रॅलीजचा जणू सराव केला, तसेच ड्रॉप्स शॉट्‌सही प्रभावी होते. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीस 40 हून जास्त शॉट्‌सची रॅली झाली, सिंधू काही वेळ मागेही पडली, पण कोर्टच्या दोन्ही कोपऱ्यात शटलची अचूक पेरणी करीत सिंधूने आघाडी घेतली आणि ती वाढवतच नेली. 

निर्णायक गेमच्या अंतिम टप्प्यात सलग सहा गुण जिंकत श्रीकांतने आगेकूच केली खरी, पण त्यालाही खेळातील चढ-उतार सलत असतील. स्पेनच्या प्रतिस्पर्ध्याने बचाव आणि आक्रमणाची घातलेली सांगड श्रीकांतची डोकेदुखी वाढवत होती. पहिला गेम जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये त्याने सलग सात गुण गमावले. निर्णायक गेममध्ये त्याने 11-11 बरोबरीनंतर खेळ उंचावत विजय मिळविला. 

पहिला गेम जिंकल्यावर चुका झाल्या. या चुका तिसऱ्या गेमच्या सुरुवातीसही झाल्या. नेमके काय चुकत होते तेच कळत नव्हते. त्यावेळी मी खूप काही करून बघितले होते. पराजित होता होता वाचलो आहे. आता मार्गदर्शकांबरोबर चर्चा केल्याशिवाय स्वस्थता लाभणार नाही. 
- किदांबी श्रीकांत


​ ​

संबंधित बातम्या