जेरेमी लार्लिनुन्गा दहाव्या स्थानावर

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

-युवा ऑलिंपिक विजेता भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लार्लिनुन्गा याला जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्यात अपयश आले

-जेरेमीला 67 किलो वजनी गटात दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

-जेरेमीने 136 आणि 163 असे एकूण 296 किलो वजन उचलले.

पट्टाया (थायलंड), ता. 20 ः युवा ऑलिंपिक विजेता भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लार्लिनुन्गा याला जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्यात अपयश आले. जेरेमीला 67 किलो वजनी गटात दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 
जेरेमीने 136 आणि 163 असे एकूण 296 किलो वजन उचलले. या कामगिरीने तुलनेत सोप्या असलेल्या "ब' गटात त्याला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांचे अंतिम स्थान "अ' गटातील स्पर्धा संपल्यावर निश्‍चित होईल. 
भारताच्या 16 वर्षीय जेरेमीने स्नॅट प्रकारात 132 किलोने सुरवात केल्यावर दुसऱ्या प्रयत्नांत आपल्या वजनापेक्षा दुप्पट 136 किलो वजन उचलून कमाल केली. मात्र, तिसऱ्या प्रयत्नांत त्याला 139 किलो वजन उचलण्यात अपयश आले. क्‍लिन अँडक जर्क प्रकारात जेरेमीला केवळ एकदाच 160 किलो वजन उचलता आले. दुसऱ्या प्रयत्नांत 165 आणि तिसऱ्या प्रयत्नांत 167 किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. चीनच्या फेंग ल्युडोंगने 333 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. मेक्‍सिकोचा जोनाथन मुनोज मार्टिनेझ आणि इंडोनेशियाचा डेनी या दोघांनी 312 किलो वजन उचलले. मात्र, क्रमवारीत मार्टिनेझ सरस असल्याने त्याला रौप्यपदक देण्यात आले. 
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने गेल्याचवर्षी 67 किलो वजन गटाचा ऑलिंपिकमध्ये समावेश केला होता. तेव्हापासून जेरेमीची ही चौथी स्पर्धा होती. त्याने गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये युवा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. जागतिक स्पर्धेतील कामगिरीतून मिळणाऱ्या गुणांचा ऑलिंपिक प्रवेशासाठी अंतिम मानांकन ठरवताना विचार केला जात असल्यामुळे या स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या