World Cup 2019 : बेअरस्टॉच्या शतकी खेळीनंतर यजमानांना ब्रेक; न्यूझीलंडपुढे 306 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

न्यूझीलंडने आज आक्रमणात बदल करताना सॅंटनर या फिरकी गोलंदाजाकडून सुरवात केली, परंतु त्याच्या पहिल्याच षटकात नऊ धावा फटकावून बेअरस्टॉ आणि रॉय यांनी आपला पवित्रा दाखवून दिला.

वर्ल्ड कप 2019 : चेल्टर ली स्ट्रीट : जॉनी बेअरस्टॉचे सलग दुसरे शतक तसेच त्याने जेसन रॉयशी केलेली वेगवान शतकी भागीदारी त्यामुळे साडेतीनशे धावांचा टप्पा अवाक्‍यात आलेल्या इंग्लंडला आज (बुधवार) विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जेमतेम 305 धावांपर्यंतच मजल मारता आली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. 

बेअरस्टॉ आणि जेसन रॉय यांनी भारताविरुद्धच्या सामन्याचा दुसरा अंकच जणू सादर करताना न्यूझीलंड गोलंदाजांवर हल्ला चढवला. न्यूझीलंडने आज आक्रमणात बदल करताना सॅंटनर या फिरकी गोलंदाजाकडून सुरवात केली, परंतु त्याच्या पहिल्याच षटकात नऊ धावा फटकावून बेअरस्टॉ आणि रॉय यांनी आपला पवित्रा दाखवून दिला. 

न्यूझीलंडने आज अनुभवी साऊदीला संधी दिली, पण इंग्लंडच्या सलामीवीरांवर कोणाचाच प्रभाव पडला नाही. फॉर्मात असलेल्या बोल्टवरही ते तुटून पडले होते. रॉय आणि बेअरस्टॉ यांना रोखणे कठिण वाटत होते. त्यांनी 88 चेंडूंतच शतकी सलामी दिली. त्या वेळी इंग्लंड सहज साडेतीनशे धावांचा टप्पा गाठणार असे चित्र होते. 

नीशाम गोलंदाजीला आला आणि थोडे चित्र बदलले. रॉयला बाद करून त्याने ही जोडी फोडली. त्यानंतर बोल्टने ज्यो रूट आणि बढती देण्यात आलेल्या जॉस बटलर यांना बाद केले तेथूनच इंग्लंडच्या डावाची स्थिती बदलण्यास सुरवात झाली. भारताविरुद्ध तडाखेबंद खेळी करणारा बेन स्टोक्‍स एकदा धावचीत होता होता वाचला; परंतु त्याची आजची खेळी 11 धावांचीच राहिली. त्यासाठी त्याने 27 चेंडू खर्ची घातले. 
कर्णधार इयॉन मॉर्गन एक बाजू सांभाळत होता, त्यामुळे इंग्लंडने पुन्हा तीनशे धावांचा विचार सुरू केला. त्यांनी 40 व्या षटकांत 4 बाद 241 धावा केल्या. अखेरच्या 10 षटकांत त्यांना वेग वाढवण्यात अपयश आले आणि दुसरीकडे त्यांच्या विकेटही गेल्या. अखेरची तीन षटके शिल्लक होती तरी त्यांच्या खात्यात 277 धावाच होत्या. त्यात मॉर्गनही बाद झाला होता. परंतु प्लंकेट आणि आदील रशिद यांनी योगदान दिल्यामुळे तीनशे धावांना भोज्जा करता आला. 

संक्षिप्त धावफलक : 

इंग्लंड : 50 षटकांत 8 बाद 305 (जेसन रॉय 60 -61 चेंडू, 8 चौकार, जॉनी बेअरस्टॉ 106 -99 चेंडू, 15 चौकार, 1 षटकार, इयॉन मॉर्गन 42 -40 चेंडू, 5 चौकार, प्लंकेट नाबाद 15, रशिद 16, ट्रेंट बोल्ट 10-0-56-2, हेन्‍री 10-0-54-2, नीशाम 10-1-41-2)


​ ​

संबंधित बातम्या