World Cup 2019 : शेवटच्या सामन्याने समीकरणे बदलली

सुनंदन लेले
Sunday, 7 July 2019

आता भारतीय संघ 15 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाल्याने पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 9 जुलैला रंगेल आणि मग इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना एजबॅस्टन मैदानावर 11 जुलैला होईल. 

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ‘अरे प्रवासाचे बेत बदला आता, कारण आपल्याला आता बर्मिंगहॅमला नव्हे, तर मँचेस्टरला जायला लागेल’. लीडस् गावातील हेडिंग्ले मैदानाच्या पत्रकार कक्षात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बघताना भारतीय पत्रकार एकमेकांना समजावत होते. सगळ्यांनी भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना बर्मिंगहॅमला होणार, असे गृहीत धरून प्रवासाची आखणी केली होती.

शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाला चांगल्या खेळाचा खरा सूर गवसला आणि त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थानी बसलेल्या कांगारूंना पराभवाचा जोरदार झटका दिला. आता भारतीय संघ 15 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाल्याने पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 9 जुलैला रंगेल आणि मग इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना एजबॅस्टन मैदानावर 11 जुलैला होईल. 

‘‘या विजयाने झालेले नुकसान भरून निघणार नाहीये, पण आम्ही थोड्या बर्‍या विचारांनी मायदेशात परत जाऊ. आमच्या संघाची खरी गुणवत्ता काही मोजक्याच सामन्यात दिसून आली. त्यातील हा सामना होता. तरीही मला चाहत्यांची माफी मागावी लागेल. आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. सातत्य राखले नाही. हे मात्र नक्की झाले आहे की, आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवल्याने स्पर्धेतील समीकरणे बदलली आहेत.’’ असे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने सामना संपल्यानंतर व्यक्त केले. 

भारतीय संघातील खेळाडू श्रीलंकेवरील दिमाखदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करताना बघत होते. गुणतक्त्यात झालेल्या बदलाने भारताला आता चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघासमोर पहिल्या उपांत्य सामन्यात ओल्ड ट्रँफर्ड, मँचेस्टरला खेळावे लागणार आहे. ‘‘आपला साखळी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसाने धुतला गेला ना....बहुतेक क्रिकेट देवाला हा सामना व्हावा, असे वाटत असणार म्हणून असा घाट घातला गेलाय,’’ असे संघ व्यवस्थापनातील एक व्यक्ती म्हणाली.

दुसरीकडे विश्वविक्रमी 5वे शतक ठोकल्यानंतर रोहित शर्मा पत्रकारांना भेटला, तेव्हा मस्त मूडमधे होता. ‘‘चांगले आहे की माझ्या कामगिरीत सातत्य आहे. हा सर्वोत्तम काळ आहे असे मी तेव्हाच म्हणेन, जेव्हा आपण अंतिम सामना जिंकून विश्वविजेते होऊ. अंतिम ध्येय ते आहे. तसे झाले, तरच ह्या शतकांना मोल आहे. आयपीएल चालू असताना मी चांगली फलंदाजी करत असूनही धावा होता नव्हत्या. माझी युवराज सिंगने समजूत काढली. तो म्हणाला की, जास्त विचार करू नकोस. योग्य वेळ येईल, तेव्हा तूच मोठ्या धावा करशील,’’ असे रोहित या चर्चेवेळी म्हणाला. 

‘‘आम्ही सध्या चांगल्या वातावरणात आहोत. जास्त कोणी क्रिकेटची चर्चा करत नाही. माझी पत्नी आणि मुलगी बरोबर असल्याने त्यात माझे लक्ष क्रिकेटपासून दूर घेऊन जातात, ज्याला खूप महत्त्व आहे. मला काय विक्रम झाले आहेत आणि काय होणार आहेत याची जास्त चर्चा करायची नाही. कारण मी तो विचार करत नाहीये. मला प्रत्येक सामन्यात नव्या ताज्या विचारांनी उतरायचे आहे,’’ असेही रोहितने या वेळी सांगितले.

धोनीचा वाढदिवस
धोनीने कुटुंबासमवेतच काल रात्री वाढदिवस साजरा केला. भारतीय संघाने आज (रविवार) सकाळी मँचेस्टरला प्रयाण केले. तेव्हा संघातील सहकाऱ्यांनी प्रवासात असताना महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरा केला. वरून कितीही शांत दिसत असला, तरी धोनी थोडासा भावनिक झाला असल्याचे संघातील खेळाडूंनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या