World Cup 2019 : फुटवर्क फार उत्तम नसलेल्या रोहितसमोर लॉकीचे आव्हान

जेफ थॉमसन
Tuesday, 9 July 2019

- जडेजा हा काही "पार्ट टायमर' नाही हे लक्षात घ्या.

-   बुमराचा जोडीदार भुवीला घेता येईल.

- पंड्या तिसरा वेगवान गोलंदाज राहील.

वर्ल्ड कप 2019 : मंगळवारी ओल्ड ट्रॅफर्डवर विराट आणि मंडळींना उपखंडासारखी खेळपट्टी मिळेल. ती छान ठणठणीत असेल. सामन्याच्या प्रारंभी चेंडू बॅटवर येईल, त्यानंतर चेंडू खाली राहील आणि त्यामुळे फिरकी गोलंदाज आनंदाने मारा करतील. हे सगळे मनात ठेवून संघनिवड फार विचारपूर्वक करावी लागेल. कोणत्याही दिवशी मी कुलदीपऐवजी नक्कीच जडेजाला खेळवेन, त्यामुळे तळाची फलंदाजी भक्कम होईल, चपळ क्षेत्ररक्षणामुळे बहुमोल धावा वाचतील आणि दहा षटके खंबीरपणे टाकले जातील.

जडेजा हा काही "पार्ट टायमर' नाही हे लक्षात घ्या. तो किफायतशीर मारा करून धावा वाचवतो आणि महत्त्वाच्या विकेट मिळवितो. विकेट घेणारा गोलंदाज म्हणून तो नक्कीच पर्याय ठरतो. तो उत्तुंग फटके मारू शकतो. परिस्थिती उद्‌भवली तर तो डावाच्या अंतिम टप्प्यात वेगाने धावा काढू शकतो. 

या सामन्यासाठी कुलदीपऐवजी जडेजाला निवडणे म्हणूनच सरस ठरेल. माझा संघ असा राहील : राहुल, रोहित, विराट, पंत, धोनी, केदार, पंड्या, भुवनेश्‍वर, चहल आणि बुमरा. ही यादी वाचून काही जणांच्या भुवया उंचावतील याची खात्री आहे. मला आता हे स्पष्ट करूद्या. खेळपट्टीचा आपल्या बलस्थानानुसार फायदा उठवू शकतील असे धूर्त गोलंदाज तुम्हाला आवश्‍यक असतात. नुसता वेगवान मारा करून मैदानावर चौफेर धुलाई करून घेणारे गोलंदाज कामाचे नसतात. म्हणूनच मी शमीला बाहेर ठेवेन आणि वेगवान गोलंदाज म्हणून बुमराचा जोडीदार भुवीला करेन. पंड्या तिसरा वेगवान गोलंदाज राहील. फिरकी गोलंदाजीत मी चहल व जडेजा यांना घेईन. एका प्रमुख गोलंदाजाने धावा दिल्या तर तिसरा पर्याय केदार असेल. 

विल्यमसन आणि डावखुरा मुन्रो यांचे अपवाद वगळले तर इतर किवी फिरकी मारा फार सफाईने खेळू शकत नाहीत. खेळपट्टी संथ असल्यामुळे जादा फिरकी गोलंदाज खेळविणे हुशारीचे लक्षण ठरेल. शमीबाबत समस्या अशी आहे, की सुरवातीला चांगला मारा करतो; पण नंतर फलंदाजांना बाद करण्याच्या प्रयत्नात अखेरीस धावा देतो. हेच भुवी हुशारी दाखवितो आणि वेगात वैविध्य साधतो. कमी वेगाचे बाऊन्सर टाकून तो फलंदाजांना रोखतो. अशावेळी या सामन्यासाठी भारताचे डावपेच काय असतील आणि ते गोलंदाजीत कुणाची निवड करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

आणखी एक पर्याय असा असेल, की एक जादा गोलंदाज खेळवायचा आणि एक फलंदाज काढायचा. मागील सामन्यात कार्तिक सातव्या क्रमांकावर खेळला. माझ्या मते विराटने केदारला खेळवावे, त्यामुळे अष्टपैलूचा पर्याय मिळेल.

इथे एक फलंदाज काढून शमीलाही खेळविता येईल; पण खेळपट्टी संथ असल्यामुळे माझ्यासाठी केदार सर्वोत्तम पर्याय ठरेल. हेच पाऊस पडून ढगाळ हवामान असेल तर शमी हा स्वाभाविक पर्याय राहील. पाऊस पडला तर बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन हे दोघेसुद्धा धोकादायक ठरतील.

लॉकी तंदुरुस्त असेल तर तो खेळेल आणि साऊदी संघाबाहेर राहील. मी काही वेळा लॉकीला मार्गदर्शन केले आहे. तो जिगरबाज गोलंदाज आहे. तो बराचसा कमिन्ससारखा आहे. तो क्रिझचा वापर आपल्या फायद्यासाठी उठवितो. काही वेळा तो तिरकस कोन साधण्यासाठी थोडा बाजूने (ऍक्रॉस) येतो. त्या वेळी तो सलामीच्या फलंदाजांना खास करून रोहितला अडचणीत आणू शकतो. चेंडू वेगाने आत आणण्याची लॉकीची शैली आहे.

रोहित प्रामुख्याने हात आणि नजर यांतील समन्वयावर अवलंबून असतो. संघातील सर्वोत्तम फुटवर्क असलेल्यांपैकी तो नाही. विराट आणि रोहितचा खेळ पाहताना हेच लक्षात येईल. सरस फुटवर्कमुळे विराट चेंडूचा कोन जास्त चांगल्या प्रकारे "कव्हर' करतो. हेच रोहित फुटवर्कमध्ये कमी पडतो. त्याला लॉकीच्या गोलंदाजीचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल, कारण लॉकी वेगवेगळ्या चेंडू कोनांतून टाकतो आणि तो विविध टप्प्यांवर उसळवितो. 

सुरवातीला बोल्ट, लॉकी यांचा मारा खेळून काढायचा आणि जास्त विकेट गमावयाच्या नाहीत हे भारतासाठी योग्य ठरेल. ग्रॅंडहोम, नीशॅम, हेन्री, सॅंटनर धावांसाठी तुलनेने सोपे पर्याय असतील. मी हवामानाच्या अंदाजाची माहिती घेत होतो. त्या वेळी पावसाची शक्‍यता वाटली. त्यामुळे डकवर्थ-लुईस पद्धत डोळ्यांसमोर ठेवून नंतर फलंदाजी करणे योग्य ठरेल. विराटला धावांचा पाठलाग करायला आवडतो, हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. 

पाऊस पडो किंवा न पडो भारत जिंकेल असे माझे भाकीत आहे. 
(360 कॉर्पोरेट रिलेशन्स) 


​ ​

संबंधित बातम्या