World Cup 2019 : डॉट बॉल्सवरून धोनीला धारेवर धरलेल्या सचिनचा यू-टर्न?
आता नव्या संदर्भात सचिनने म्हटले आहे की, संघासाठी जे योग्य होते तेच नेमके धोनीने केले.
वर्ल्ड कप 2019 : लंडन : महेंद्रसिंह धोनीला आधी धारेवर धरल्यानंतर सचिन तेंडुलकरने आता मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धोनीचा वेगवान फलंदाजीचा उद्देशच नसावा आणि त्याने प्रमाणाबाहेर डॉट बॉल्स खेळले, अशी टीका त्याने केली होती. आता नव्या संदर्भात सचिनने म्हटले आहे की, संघासाठी जे योग्य होते तेच नेमके धोनीने केले.
बांगलादेशविरुद्ध धोनीने 33 चेंडूंत 35 धावा केल्या. शेवटच्या 10 षटकांत भारताला 63 धावा करता आल्या. सचिन म्हणाला, की "बांगलादेशविरुद्ध धोनीच्या दृष्टिकोनात काहीही चुकीचे नव्हते. त्याची खेळी संघासाठी महत्त्वाची होती. तो 50 षटकांपर्यंत टिकला तर बरोबर खेळणाऱ्या इतर खेळाडूंना मदत करू शकतो. त्याने हे करणे अपेक्षित आहे आणि हे त्याने केले.''
संघावरील निष्ठेबद्दल धोनीचे कौतुक करून सचिनने सांगितले की, त्याच्यासाठी संघ जास्त महत्त्वाचा असतो. वेळेची गरज काय आहे त्यानुसार ते केले पाहिजे. मंगळवारी त्याने परिपूर्ण पद्धतीने ते केले.