World Cup 2019 : सातत्यपूर्ण किवींसमोर हवी शिस्त : विराट 

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

न्यूझीलंडचा संघ फार सातत्यपूर्ण खेळ करतो आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्हाला शिस्तबद्ध खेळण्याची गरज असेल, असे "टीम इंडिया'चा कर्णधार विराट म्हणाला. 
पत्रकार परिषदेत विराट अगदी दिलखुलास बोलला.

वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडचा संघ फार सातत्यपूर्ण खेळ करतो आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्हाला शिस्तबद्ध खेळण्याची गरज असेल, असे "टीम इंडिया'चा कर्णधार विराट म्हणाला. 
पत्रकार परिषदेत विराट अगदी दिलखुलास बोलला. विविध मुद्द्यांवर त्याने केलेले भाष्य -

गोलंदाजी : आमची गोलंदाजी अपेक्षित अशा उच्च दर्जाची होत आहे. सर्वोत्तम नसली तरी सर्वोत्तम माऱ्यात आमची गणना होते. न्यूझीलंडची गोलंदाजी नेहमीच संतुलित असते. 

संघाचे स्वरूप : याविषयी अजूनही चर्चा सुरू आहे. पाच गोलंदाज की सहावा घ्यायचा याचा विचार करू. तुम्ही मला आत्ताच सांगितले (2008च्या युवा वर्ल्ड कपमधील केन विल्यमसनची विकेट) त्यानुसार मी भेदक गोलंदाज आहे. जोपर्यंत मी चेंडू टाकताना घसरून पडत नाही तोपर्यंत मी फलंदाजांना बाद करू शकतो! 

सलामीवीर राहुल : राहुल सलामीवीराच्या भूमिकेत अधिकाधिक स्थिरावतो आहे. श्रीलंकेविरुद्ध हे दिसून आले. "आयपीएल'प्रमाणे तो "झोन'मध्ये जात असल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीत तो सर्वाधिक चांगले प्रदर्शन केल्याचे आपल्याला दिसू शकेल. 

नाणेफेक-तंदुरुस्ती : नाणेफेक किती महत्त्वाची आहे? मी पुन्हा हेच सांगेन की दडपण हाताळण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. दडपण खूप जास्त असेल; पण नाणेफेकीची आम्हाला काळजी नाही. 

सामन्याविषयी : साखळीपेक्षा बाद फेरी थोडी वेगळी असते. साखळीत तुम्ही काही प्रयोग करू शकता, पण इथे तुम्हाला अचूक राहावे लागते. निर्णयप्रक्रिया महत्त्वाची असेल. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही सामोरे जाता तशी स्थिती काही वेळा येते. 

स्वतःची भूमिका : मी मध्यवर्ती भूमिकेत आहेत. ती बजावताना मला आनंद वाटतो. वैयक्‍तिक उच्चांकांची मला फिकीर नाही. रोहितसुद्धा त्यादिवशी (श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर) हेच म्हणाला. रोहित या घडीचा सर्वोत्तम वन-डे फलंदाज आहे. 

एकूण दृष्टिकोन : क्रिकेटच्या मैदानावर उतरून, "अरे हा तर सोप्पा सामना आहे' असे मी शेवटचे कधी म्हणालो हे आठवत नाही. वर्ल्डकप बाद फेरी अर्थातच जास्त दडपणाची असेल. दोन संघांमधील मालिकेच्या तुलनेत जास्त आव्हान असेल. अशा वेळी क्रिकेटच्या खेळातील एक सामना असा दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरेल. 

एकूण बलाबल : जो संघ योजनाबद्ध खेळ धाडसाने करेल, या संघाला विजयाची सरस संधी असेल. आम्ही बऱ्याच वेळा बाद फेरी, अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे "अ' दर्जाचा खेळ प्रदर्शित करणे दोन्ही संघांना आवश्‍यक आहे. जो दडपणावर मात करेल तो श्रेष्ठ ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या