अशी होणार जागतिक कसोटी स्पर्धा
सर्वात प्रथम 2010 मध्ये कसोटीच्या जागतिक स्पर्धेची चर्चा झाली. जेव्हा 2013 पासून स्पर्धेला सुरवात करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आयसीसी चॅंपियन्स करंडक रद्द करण्याचा विचार काही संघांच्या विरोधामुळे 2017पर्यंत निर्णय पुढे ढकलला.
लंडन : कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या जागतिक स्पर्धेला आता अखेर सुरवात झाली आहे. अनेक वर्षे चर्चा केल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अखेर मुहूर्त लागला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ऍशेस मालिकेपासून या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरवात होईल. ही स्पर्धा 2021 पर्यंत चालणार असून, अंतिम सामना जून 2021 मध्ये लॉर्डसवर होणार आहे.
सर्वात पहिली चर्चा
सर्वात प्रथम 2010 मध्ये कसोटीच्या जागतिक स्पर्धेची चर्चा झाली. जेव्हा 2013 पासून स्पर्धेला सुरवात करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आयसीसी चॅंपियन्स करंडक रद्द करण्याचा विचार काही संघांच्या विरोधामुळे 2017पर्यंत निर्णय पुढे ढकलला. ऑक्टोबर 2017 मध्ये स्पर्धा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
किती संघ
आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या नऊ क्रमांकावर असणाऱ्या संघ यात सहभागी होतील. यात भारत, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होईल. आयर्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिका या स्पर्धेचा भाग नसतील.
स्पर्धेचे स्वरुप
सर्व नऊ संघांना किमान सहा संघांशी द्विपक्षीय मालिका खेळावी लागणार आहे. यात तीन मालिका मायदेशी आणि तीन परदेशी होतील. एका मालिकेत कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सामने होतील. सामने दिवसा खेळायचे, की दिवस-रात्र हा संबंधित क्रिकेट मंडळांचा निर्णय असेल.
किती सामने
पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेत एकूण 27 मालिका आणि 71 कसोटी सामने खेळले जातील. साखळीत अव्वल राहणाऱ्या दोन संघांत जून 2021मध्ये अंतिम सामना होईल.
असे मिळणार गुण
प्रत्येक मालिकेत एकूण 120 गुण मिळतील. दोन सामन्यांच्या मालिकेत 60 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यातील विजयास 24 गुण.
मालिकेतील सामने | विजयाचे गुण | 'टाय'साठी गुण | 'ड्रॉ'साठी गुण |
2 | 60 | 30 | 20 |
3 | 40 | 20 | 13.3 |
4 | 30 | 15 | 10 |
5 | 24 | 12 | 8 |
हरणाऱ्या संघास गुण मिळणार नाहीत.
कोण किती खेळणार सामने
भारत : 18
इंग्लंड : 22
ऑस्ट्रेलिया : 19
दक्षिण आफ्रिका : 16
न्यूझीलंड : 14
श्रीलंका : 13
पाकिस्तान : 13
बांगलादेश : 14
वेस्ट इंडिज : 15