जागतिक महिला बॉक्‍सिंगमध्ये एक मंजू जिंकली, दुसरी हरली

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

-  सहाव्या मानांकित मंजू राणीने अखेर जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतास विजय मिळवून दिला.

- मंजू बोम्बोरिया हिला चौथ्या मानांकित अँगेला कॅरीनी हिच्याविरुद्ध 1-4 पराभवास सामोरे जावे लागले

मुंबई - सहाव्या मानांकित मंजू राणीने अखेर जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतास विजय मिळवून दिला. मात्र उलान - उदे (रशिया) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंजू बोम्बोरिया हिचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. 
सहाव्या मानांकित राणीला पहिल्या फेरीत बाय होता. तिने व्हेनेझुएलाच्या रोजास केडेनो तायोनिस हिच्याविरुद्धच्या लढतीत 5-0 असा कौल मिळवला. तिने ही लढत 30-27, 30-27, 30-27, 30-24, 30-26 अशी जिंकल्याचा कौल पंचांनी दिला. आता तिची लढत अव्वल मानांकित किम ह्यांग मीविरुद्ध 10 ऑक्‍टोबरला होईल. उत्तर कोरियाच्या किमने गतवर्षी ब्रॉंझ जिंकले होते. 
राणी तसेच रोजासची सुरवात सावध होती, त्यामुळे पहिल्या फेरीत क्वचितच पंच दिसले. दुसऱ्या फेरीपासून राणी काहीशी आक्रमक झाली. तिचे पंच जास्त अचूक आणि ताकदवान होते आणि त्यामुळेच तिची सरशी झाली. आता ती पहिल्याच जागतिक स्पर्धेतील पदकापासून एक विजय दूर आहे. 
मंजू बोम्बोरिया हिला चौथ्या मानांकित अँगेला कॅरीनी हिच्याविरुद्ध 1-4 पराभवास सामोरे जावे लागले. दोघींचेही आक्रमण तोडीस तोड होते; पण कॅरीनीचा बचाव खूपच सरस होता. तिने ठोसे चुकवताना चांगली चपळाई दाखवली. त्याचवेळी ती प्रतिठोसा देत होती. त्यातून बोम्बोरिया सावरू शकली नाही. इटलीच्या कॅरीनीच्या अचूक ठोशांनी बोम्बोरियासमोरील आव्हान जास्त अवघड केले होते. 


​ ​

संबंधित बातम्या