कुस्तीगीर साक्षी मलिकला "टॉप्स'मधून वगळले

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

-  रियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकानंतर फारशी समाधानकारक कामगिरी करू न शकणाऱ्या महिला कुस्तीगीर साक्षी मलिकला केंद्र सरकारच्या "टॉप्स' योजनेतून वगळण्यात आले आहे.

- जागतिक स्पर्धेतच ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या रवीकुमार दहिया याचा या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे

-  वेटलिफ्टिंग खेळाडू रगाला वेंकट राहुल याचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. त्याला सरावासाठी मासिक 50 हजार रुपये निधी दिला जाणार आहे

नवी दिल्ली -  रियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकानंतर फारशी समाधानकारक कामगिरी करू न शकणाऱ्या महिला कुस्तीगीर साक्षी मलिकला केंद्र सरकारच्या "टॉप्स' योजनेतून वगळण्यात आले आहे. 
जागतिक कुस्ती स्पर्धेतील अपयशही तिला महागात पडले, असे मानले जात आहे. त्याचवेळी जागतिक स्पर्धेतच ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या रवीकुमार दहिया याचा या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविण्याची आशा असणाऱ्या खेळाडूंना या योजने अंतर्गत सरावासाठी आर्थिक मदत केली जाते. 
या यादीमध्ये 88 खेळाडूंचा समावेश असून, कामगिरीत सातत्य दाखविण्यात अपयशी ठरलेल्या साक्षी मलिकला वगळण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत दीपक पुनिया, विनेश फोगट, बजरंग पुनिया या कुस्तीगिरांचा यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. 
त्याचवेळी वेटलिफ्टिंग खेळाडू रगाला वेंकट राहुल याचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. त्याला सरावासाठी मासिक 50 हजार रुपये निधी दिला जाणार आहे. महिला खेळाडू मीराबाई चानू हिलादेखील फिजिओ शिवानी भरुका यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी आर्थिक मदत मान्य करण्यात आली आहे. याविषयी चानूने क्रीडा मंत्रालयाकडे विनंती केली होती. 
--------------- 
पूजाला प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत 
महिला कुस्तीगीर पूजा धांडा हिचा "टॉप्स' योजनेत समावेश नसला तरी, तिने रुमानियाचे प्रशिक्षक फनेल कार्प यांच्या मार्गदर्शनाखाली हिस्सार येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. क्रीडा मंत्रालयाने तिची विनंती स्वीकारताना एक महिन्यासाठी तिला आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, त्याचा आकडा जाहीर केला नाही. 


​ ​

संबंधित बातम्या