बॅडमिंटनवरून लक्ष दूर झाल्याचे म्हणणे चुकीचे! - सिंधू

वृत्तसंस्था
Wednesday, 13 November 2019

- जागतिक स्पर्धा विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूपच चांगला होता. त्या अनुभवातून बाहेर पडण्यास वेळ लागला

- माझा आत्मविश्‍वास खच्ची झाला आहे, खेळाऐवजी अन्य गोष्टीस महत्त्व देत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. माझा सराव चांगला सुरू आहे

मुंबई - जागतिक स्पर्धा विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूपच चांगला होता. त्या अनुभवातून बाहेर पडण्यास वेळ लागला. मात्र, माझा आत्मविश्‍वास खच्ची झाला आहे, खेळाऐवजी अन्य गोष्टीस महत्त्व देत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. माझा सराव चांगला सुरू आहे, असे पी. व्ही. सिंधूने सांगितले. 
हॉंगकॉंग स्पर्धेत पहिल्या फेरीत सिंधूने तिच्या लौकिकास साजेसा खेळ करीत झटपट विजय मिळवला. या विजयानंतर सिंधूने जागतिक स्पर्धेनंतर तिच्या कामगिरीबाबत भाष्यही केले. जागतिक स्पर्धेतील खेळावर मी खूप खूश होते. त्या यशाच्या आनंदातून बाहेर पडण्यास वेळ लागला. हे विजेतेपद माझ्यासाठी खूपच मोलाचे होते. मी चांगली खेळत आहे. माझ्यावर कोणतेही मानसिक दडपण नाही, असे सिंधूने सांगितले. ती म्हणाली, काही सामने गमावले असले तरी त्यातून मी अधिक कणखर झाली आहे. मला जोषात परतावे लागणार आहे. ऑगस्टमधील जागतिक स्पर्धेनंतर फारशी चांगली खेळी झाली नाही, पण हे घडत असते. 
जागतिक स्पर्धेतील विजेतेपदानंतर सिंधूची लोकप्रियता खूपच वाढली आहे. विजेतेपदानंतर सत्कार होणे स्वाभाविकच आहे. त्याबाबत माझी कोणतीही तक्रार असण्याचे कारण नाही. मी कायम सरावास जास्त महत्त्व देते. बॅडमिंटन कोर्टवरील कामगिरीमुळेच मी प्रसिद्ध आहे. अनेकांना माझ्या कामगिरीतून प्रेरणा मिळते. माझ्या ऑलिंपिक पदकानंतर भारतीय बॅडमिंटनची खूपच प्रगती झाली आहे, असे सिंधूने सांगितले. 
ऑलिंपिक येत आहे, त्यासाठी पूर्ण तंदुरुस्त राहणे जास्त महत्त्वाचे आहे. खेळातील चुका सरावातून दूर करता येतात, पण तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे, असे तिने सांगितले. मार्गदर्शक पार्क तेई सॅंग यांचा खूपच फायदा होत होता, पण काही गोष्टींची तयारी असावी लागते. अखेर कोर्टवर जे काही करायचे आहे, ते मलाच करायचे आहे असे तिने सांगितले


​ ​

संबंधित बातम्या