प्रो-कबड्डी - पुणेरी पलटणची अखेरही पराभवाने

वृत्तसंस्था
Sunday, 6 October 2019

- यूपी योद्धाज संघाने घरच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यात रविवारी पलटणचा 43-39 असा पराभव केला. 

- प्रदीपने सामन्यात आणखी एक सुपर टेन कामगिरी करताना 34 गुणांची कमाई केली. त्याचबरोबर सुपर टॅकलचे दोन गुण मिळवून त्याने सामन्यात 36 गुण नोंदवले. त्याचबरोबर कारकिर्दीत दुसऱ्यांदा एकाच सामन्यात तीनशेहून अधिक गुण नोंदविण्याची कामगिरी केली

- पुणे आणि पाटणा या दोन संघांचा सातव्या मोसमातील प्रवास थांबला. पुणे संगाने 48 गुण मिळविले, तर माजी विजेत्या पाटणा संघाला 51 गुणांवर समाधान मानावे लागले. 

ग्रेटर नोएडा ः प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाची सुरवातही पराभवाने करावी लागलेल्या पुणेरी पलटण संघाला अखेरच्या सामन्यातही पराभवाचाच सामना करावा लागला. यूपी योद्धाज संघाने घरच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यात रविवारी पलटणचा 43-39 असा पराभव केला. 
प्रो-कबड्डीचे विजेतेपद अनुभवणारा आणि प्रचंड संयमाने खेळणाऱ्या अनुप कुमारला प्रशिक्षक केल्यानंतरही पुणेरी पलटण संघाला सातव्या मोसमात प्रभाव पाडता आला नाही. सातव्या मोसमात पहिल्या तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी जरूर काही सामन्यात प्रभाव पाडला. पण, त्यांना प्ले-ऑफपर्यंत पोचता आले नाही. अखेरच्या सामन्यात आज आक्रमणात 21-20 अशा निसटत्या पिछाडीनंतरही बचावात 17-15 अशी आघाडी घेऊनही त्यांना विजयाला गवसणी घालता आली नाही. सामन्यात स्वीकारावे लागलेले दोन लोण त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. कर्णधार सुरजितने "हाय फाईव्ह' कामगिरी केली. पण, तेवढी पुरेशी ठरली नाही. तुलनेत यूपीकडून आज खेळलेल्या एका राखीव खेळाडूसह प्रत्येकाने किमान एका गुणाची कमाई करून आपली सांघिक खेळाची छाप पाडली. 
यूपीकडून प्रथमच मोनू गोयतचा सहभाग आकर्षण ठरला. त्याला चार गुणांचीच कमाई करता आली असली, तरी प्ले-ऑफसाठी तो उपलब्ध असल्याचा फायदा त्यांना नक्की होईल. पलटणकडून आज मनजीत, नितीन तोमर, अमित कुमार यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्याही प्रत्येक खेळाडूने गुणाची कमाई केली. तरी त्यांची लढत कमीच पडली. यूपीकडून रिशांक देवाडिदा, नितेश कुमार, सुरेंद्र सिंग, सचिन कुमार यांनी चांगला सराव करून घेतला. 

प्रदीपचा आणखी एक विक्रम 
त्यापूर्वी, पहिल्या सामन्यात प्रदीप नरवालने आव्हान संपुष्टात आलेल्या पाटणा पायरेट्‌सच्या खेळात जान ओतली. त्यांनी बंगाल वॉरियर्सवर 69-41 असा विजय मिळविला. सर्वाधिक गुणांचा सामना आणि प्रदीपचे विक्रम यामुळे हा सामना लक्षात राहील. अर्थात, पाटणाच्या या विजयाचा प्ले-ऑफच्या क्रमवारीत काही फरक पडणार नव्हता. प्रदीपच्या विक्रमाचे आणि विजयाचे समाधान पाटणा संघाला मिळवता आले. 
प्रदीपने सामन्यात आणखी एक सुपर टेन कामगिरी करताना 34 गुणांची कमाई केली. त्याचबरोबर सुपर टॅकलचे दोन गुण मिळवून त्याने सामन्यात 36 गुण नोंदवले. त्याचबरोबर कारकिर्दीत दुसऱ्यांदा एकाच सामन्यात तीनशेहून अधिक गुण नोंदविण्याची कामगिरी केली. त्याने या मोसमात गुणांचे त्रिशतकही साजरे केले. सलग दोन मोसमात तीनशे गुण करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. 
बंगालकडून राकेश नरवाल याने सुपर टेन कामगिरी केली. त्याचबरोबर पदार्पण करणाऱ्या सौरभ पाटीलने पदार्पणातच सुपर टेन कामगिरी करताना आपली छाप पाडली. बंगालने त्यांच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्याचा फटका त्यांना बसला असला तरी प्ले-ऑफचे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचे त्यांच्या दुसऱ्या फळीच्या खेळाडूंनी दाखवून दिले. सौरभ पाटील आणि राकेश नरवाल यांची कामगिरी त्यांना नक्कीच पुढील फेरीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 
आजच्या दोन सामन्यांनंतर पुणे आणि पाटणा या दोन संघांचा सातव्या मोसमातील प्रवास थांबला. पुणे संगाने 48 गुण मिळविले, तर माजी विजेत्या पाटणा संघाला 51 गुणांवर समाधान मानावे लागले. 
 


​ ​

संबंधित बातम्या